अनोखी किमया! अंडी उबवण केंद्रात चार मोरांच्या पिल्लांचा जन्म

 Pune poultry farms : पुणे येथील अंडी उबवण केंद्रात लांडोरीच्या अंड्यांपासून चार मोरांच्या पिल्लांना जन्म देण्यात आला आहे.  

Updated: Dec 4, 2021, 08:55 AM IST
अनोखी किमया! अंडी उबवण केंद्रात चार मोरांच्या पिल्लांचा जन्म title=
संग्रहित छाया

जावेद मुलानी / पुणे :  Pune poultry farms : येथील अंडी उबवण केंद्रात लांडोरीच्या अंड्यांपासून चार मोरांच्या पिल्लांना जन्म देण्यात आला आहे. (Four peacock chicks born) हा देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. चक्क इनक्यूबेटरमध्ये मोरांचा जन्म झाला आहे. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील इला फाऊंडेशनला मोठे यश आले आहे.

अंडी उबवण केंद्रात कोंबडीच्या अंड्यांना कृत्रिमरित्या उबवून पिलांचा जन्म होतो हे आपल्याला माहीत आहे. पण, अशा अंडी उबवण केंद्रात प्रथमच लांडोरीच्या अंड्यांपासून चार मोरांच्या पिल्लांचा जन्म झाल्याची देशातील पहिली घटना महाराष्ट्रात घडली आहे. (hatches peafowl eggs in Pune poultry farms)

अनोखी किमया! अंडी उबवण केंद्रात चार मोरांच्या पिल्लांचा जन्म

महाराष्ट्र वनविभाग आणि इला फाउंडेशनच्यावतीने चालवण्यात येणार्‍या  पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील इला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ही किमया करण्यात या सेंटरला यश आले आहे. 

विणीच्या हंगामात लांडोर फार सावध असतात. लांडोर शेताच्या बांधावर, माळरानावर अंडी घालतात. तसेच काटेरी वनस्पतींमध्येही हे अंडे लपवतात. जर ते अंडे नागरिकांना सापडले किंवा त्यांना त्रास झाला तर लांडोर ते अंडी सोडूनही देतात. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत मोर पक्षाचे अंडी हाताळण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

बहुतांश वेळा लांडोरीची अंडी सापडल्याने सहानुभूतीच्या भावनेतून लोक अंडी वाचवतात आणि ते उबवण्यासाठी घरच्या कोंबडीखाली ठेवतात. कोंबड्याही त्या अंडी उबवतात परंतू, या अंड्यांचा आकार मोठा असल्याने ते योग्य रितीने उबवले जात नाही. तसेच त्याचा आकार न जुळल्यामुळे, बहुतेक वेळा लांडोरीची अंडी उबवली न जाता ती निकामी होतात. त्यामुळे कायद्यानेही असे करण्यास परवानगी नाही. 

दरम्यान, इला फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी इला ट्रांझिट सेंटर येथे कृतिमरित्या उबवण पेटीमध्ये (इनक्यूबेटर) ही अंडी ठेवली आणि त्यातून मोरांना जन्म देण्यात यश मिळवले आहे. मोरांचे अंडी उबवण्याबाबतचे हे एक अधिकृत इन्क्युबेशन सेंटर आहे.

याबाबत माहिती देताना इला फाऊंडेशनचे  संचालक  डॉक्टर  सतीश पांडे यांनी सांगितले की, आम्हाला या अंडी उबवण केंद्रात चार मोराची अंडी पूर्णपणे उबवण्यात यश आले आहे. हे भारतात प्रथमच घडले आहे. नागरिकांना अशाप्रकारे अंडी शेतात आढळून आल्यानंतर त्यांनी वनविभाग किंवा आमच्याशी संपर्क करा, स्वतः अंडी हाताळू नका, असे आवाहन केले आहे.