यवतमाळ येथे पावसाचा हाहाकार! 97 जण पुरात अडकले, हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका

यवतमाळ शहरात अतिमुसळाधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे, सर्वच भागात नाले तुंबल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरून संसारोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे, बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी चिखल साचला आहे. 

Updated: Jul 22, 2023, 06:33 PM IST
यवतमाळ येथे पावसाचा हाहाकार! 97 जण पुरात अडकले, हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका  title=

Yavatmal Rain Update :  यवतमाळ जिल्ह्यातील पुरानं वेढलेल्या महागावात हवाई दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेय. पुरात  अडकलेल्या 97 लोकांची सुटका करण्यासाठी वायूदलाचं MI 17 V5 हेलिकॉप्टर नागपूरहून महागाव येथे दाखल जाले. हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचावकार्य राबवण्यात आले. तर, दुसरीकडं SDRF ची टीम देखील महागावात पोहोचली आहे. SDRF च्या बोटीमधून पूरग्रस्तांना बाहेर काढण्यात आले.

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील अनंतनगर गावाला पुराचा वेढा

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील अनंतनगर गावाला पुराने वेढा घातल्याने ग्रामस्थ अडकून पडले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनानं हेलिकॉप्टरसह SDRFची टीम बचावकार्यासाठी बोलावली. तर धनोडा, खडका आणि पेढी गावात अडकलेल्या 40 ग्रामस्थांना आपत्ती प्रतिसाद दलानं सुखरूप बाहेर काढलं. तसंच आर्णी तालुक्यातील कवठा बाजारच्या पुरात अडकलेल्या दोघा जणांसाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पूरस्थिती असून अनेक मार्ग बंद पडलेत. 
यवतमाळच्या महागाव तालुक्यात पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, आनंदनगर तांडा इथे 97 लोक अडकले होते. 

जीव वाचवण्यासाठी झाडांचा आसरा घेतला

यवतमाळच्या वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे वाघाडी गावाला पुराचा वेढा बसला. गावातील 50 ते 60 घरात पुराचे पाणी शिरलंय.  रात्री अचानक गावात पाणी शिरल्यानं गावक-यांनी जीव वाचवण्यासाठी झाडांचा आसरा घेतला. पुराच्या तडाख्यानं अनेक घरांची पडझड झाली. यावेळी अंगावर घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान सकाळी स्वयंसेवी संस्था आणि बचाव पथकं गावात दाखल झाले आणि त्यांनी या ग्रामस्थांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.

रेड अलर्ट जारी

वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय..पावसामुळे अनेक नदी - नाल्यांना पूर आला आहे.  वाशिमच्या मानोरा तालुक्यात पावसाने हाहाकार माजलाय. सकाळपासून पोहरादेवी परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. गव्हा  गावच्या नदीला पूर आलाय. मानोरा -असोला गावाचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे धानोरा गाडगे-चिखली-मानोरा मार्ग बंद झालाय. मुख्य म्हणजे या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतात पाणी साचल्याने पीकं वाया जाण्याची भीती शेतक-यांना आहे. 

नदी नाल्यांना मोठा पूर

वर्ध्यात दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहेय. या पावसाने नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा आणि यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली या गावाला मागच्या वर्षी पुराचा वेढा होता. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. या वर्षी प्रशासन अलर्ट मोडवर असून गावकऱ्यांना पुराबाबत सूचना दिल्या आहेत.