काटोल विधानसभा पोटनिवडणूक: उमेदवारांबाबत मतदारांमध्ये उत्सूकता

इच्छुक उमेदवार निवडणुकीचं बाशिंग बांधून सज्ज 

Updated: Mar 11, 2019, 05:28 PM IST
काटोल विधानसभा पोटनिवडणूक: उमेदवारांबाबत मतदारांमध्ये उत्सूकता title=

नागपूर : लोकसभा निवडणुकीसोबतच नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभेची पोटनिवडणूक देखील जाहीर झाल्यावर कुठल्या पक्षाचा कोण उमेदवार असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आशिष देशमुख यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत असून निवडणून आलेल्या उमेदवाराला केवळ तीन महिन्यानंच कालावधी मिळणार असल्याने निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार आशिष देशमुख विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि सख्खे काका अनिल देशमुख यांचा दोन हजार सहाशे मतांनी पराभव केला होता. 

पहिल्यांदाच आमदार झालेले देशमुख यांचे मात्र नंतर भाजपमध्ये मन काही रमले नाही व गेल्या दीड वर्षांपासून ते पक्षविरोधात बोलू लागले. अखेर २ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांनी पक्ष व आमदारकीचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली. काही महिन्यांपूर्वी पाच राज्याच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीसोबत काटोल मतदारसंघाची निवडणूक होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच म्हणजे ११ एप्रिलला काटोल विधानसभा पोट निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तरीही निवडणुकीची तयारी ही पूर्वीपासूनच होती व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या पोटनिवडणुकीत महत्वाचे मुद्दे राहणार असल्याचं राष्ट्रवादी नेते अनिल देशमुखांनी म्हटलं आहे. गेली अनेक वर्षे अनिल देशमुखांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले असून राष्ट्रवादीच्या कोट्यातील या जागेवर सध्यातरी त्यांचेच नाव पुढे येत आहे.

भाजप-शिवसेना युती असताना २००९ मध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. मात्र २०१४ मध्ये भाजप - सेनेने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने भाजप उमेदवार आशिष देशमुख येथून विजयी झाले. विजयी उमेदवार हा भाजपचा असल्याने भलेही आता युती झाली असली तरी या जागेवर भाजपचाच दावा असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार सांगतात. भाजप मध्येही उमेदवारीसाठी इच्छुकांची काही कमी नाही. नागपूर महापालिकेचे नगरसेवक अविनाश ठाकरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, भाजप ग्रामीणचे महामंत्री संजय टेकाडे यांची नावे आघाडीवर आहेत. तरीही पोटनिवडणुकीत उमेदवार कोण असेल हे पक्षांतर्गत ठरवण्यात येणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव पोतदार यांनी म्हटलं आहे.

येत्या ११ एप्रिल ला मतदान झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी निकाल लागणार आहेत. त्यामुळे विजयी उमेदवाराला पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत केवळ तीन महिन्यांचा कालवधी मिळणार आहे. तरीही युतीची उमेदारी आपणास मिळावी म्हणून इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून सज्ज झाले आहेत.