नेत्यांकडून जागावाटप पण कार्यकर्ते एकजूट दाखवणार? उद्धव स्पष्टच म्हणाले, 'आपण कशासाठी आणि..'

Uddhav Thackeray On Maha Vikas Aghadi Party Workers: महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आज घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जागावाटापाची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 9, 2024, 12:32 PM IST
नेत्यांकडून जागावाटप पण कार्यकर्ते एकजूट दाखवणार? उद्धव स्पष्टच म्हणाले, 'आपण कशासाठी आणि..' title=
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंनी दिलं उत्तर

Uddhav Thackeray On Maha Vikas Aghadi Party Workers: महाविकास आघाडीने आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकूण 21 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. त्याखालोखाल काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. तसेच 10 जागांवर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गट निवडूण लढेल असं जाहीर करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अगदी मतदारसंघनिहाय यादी वाचून दाखवत पत्रकारांसमोर ही घोषणा केली. या घोषणेनंतर वरील स्तरावर निर्णय झाला असला तरी तळागाळातील कार्यकर्ते एकजुटीने लढतील का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाला उत्तर दिलं. 

हे वर्ष हुकूमशाही नष्ट होण्याचं जावो

उच्च पातळीवरील नेत्यांनी महायुतीमध्ये एकत्र येत जागावाटपाचा निर्णय घेतला आहे असा संदर्भ देत पत्रकराने शिवायलय येथे आयोजित पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारला. 'वर जरी निर्णय झाला असला तरी खाली कार्यकर्ते एकजुटीने काम करतील का?' असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना. "नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व जनतेला हे वर्ष सुखा, समृद्धीचं आणि नवीन वर्ष हुकूमशाही नष्ट होण्याचं जावो या शुभेच्छा देतो," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

सर्व महत्त्वकांक्षांना आवर घालून...

"युती किंवा आघाडी म्हटल्यावर जागा वाटपाबद्दल शक्य तितकी चर्चा करतो. मात्र एक क्षण असा येतो की एकमेकांना समजून घेऊन जागा वाटप जाहीर करुन एकत्र निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली पाहिजे तो क्षण आज आलेला आहे. आजच्या पत्रकार परिषदेतून सगळ्यांना उत्तरं मिळाली असतील. आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवर वगैरे असं काहीही नसतं. इच्छा, महत्त्वकांक्षा ही सर्वांची असते. मात्र परत परत सांगतो की जिंकण्याचं एक जिंकण्याचं एक मोठं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर या सर्व इच्छा आणि महत्त्वकांक्षांना आवर घालून, आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेऊन लढावं लागतं आणि जिंकावं लागतं. म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत. सर्वजण जोमाने कामाला लागलेले आहेत. तुमच्यासमोर आल्यानंतरही आणि त्यानंतरही आम्ही महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यक्रम जाहीर करु," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> Loksabha 2024 : 21-17-10... महाविकासआघाडीचा लोकसभेचा जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

सात जागांवर उमेदवाराची घोषणा बाकी

सात जागांवरील उमेदवार जाहीर करणं बाकी आहे, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरेंनी, "शिवसेना ज्या 21 जागा लढणार ते मी जाहीर केलं आहे. एक दोन दिवसात ते उर्वरित जागा पण जाहीर करतील," असा विश्वास व्यक्त केला. शरद पवार गटाने माढा, सातारा, रावेरमधील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. तर काँग्रेसनेही 4 मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केलेले नाहीत.