राज्यातील विनाअनुदानित शाळांना मिळणार अनुदान, 'या' निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

 राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Updated: Oct 15, 2020, 07:02 AM IST
राज्यातील विनाअनुदानित शाळांना मिळणार अनुदान, 'या' निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या, अतिरिक्त शाखा यांना २० टक्के अनुदान देणे तसेच २० टक्के अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के  आणि याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या  २४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान १ नोव्हेंबर २०२० पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ एकूण ४३ हजार ११२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.

'या' निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमधील आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १ मे २०२० पासून दरमहा १० हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच विद्यावेतन वाढ देण्यात आली आहे. 

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता वैद्यकीय डॉक्टरांची नितांत आवश्यकता असल्याने सदरील निर्णय घेण्यात आला. राज्यात चार शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये ५५० पदव्युत्तर विद्यार्थी असून या वाढीव विद्यावेतनाच्या निर्णयामुळे ६ कोटी ६० लाख रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. 

या वाढीव विद्यावेतनामुळे या डॉक्टरांचा एकूण प्रति महिना विद्यावेतन आता कनिष्ठ निवासी-१ पदासाठी रुपये ६४५५१, कनिष्ठ निवासी-२ पदासाठी रुपये ६५११२ आणि कनिष्ठ निवासी-३ साठी रुपये६५६७३ इतके होईल.