'राणेंना ताटावरुन अटक केली, 80 लाख खर्च करुन कंगणा..'; शिंदेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

CM Eknath Shinde Slams Thackeray Government Over Revenge Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूर्वीच्या सरकारांनी आरक्षण देण्याची संधी असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही असंही म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 27, 2024, 04:22 PM IST
'राणेंना ताटावरुन अटक केली, 80 लाख खर्च करुन कंगणा..'; शिंदेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल title=
एकनाथ शिंदेंनी साधला निशाणा

CM Eknath Shinde Slams Thackeray Government Over Revenge Politics: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानांवरुन विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले आहेत. या आदेशानंतर विधानपरिषदेमध्ये निवेदन देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या एसआयटी चौकशीदरम्यान कोणावरही सूड बुद्धीने कारवाई केली जाणार नाही असं स्पष्ट करत विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. मात्र हे आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या अनेक प्रकरणांचा उल्लेख करत सध्याच्या विरोधकांना टोला लगावला आहे.

आधीच्या सरकारमधील गोंधळाचा उल्लेख

मुख्यमंत्री शिंदे आधीच्या सरकारच्या कारभारावर टीप्पणी करताना जवळपास अनेक विषयांचा उल्लेख करत आधीच्या सरकारवर निशाणा साधला. "नारायण राणेंना ताटावर उठवलं एवढी घाई का होती? ते तर केंद्रीय मंत्री होते. ताटावरुन उचललं एवढा काय गुन्हा होता त्यांचा?" असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. तसेच हनुमान चालीसा प्रकरणावरुन अटक झालेल्या नवनीत राणा यांचाही संदर्भ मुख्यमंत्र्यांनी निवेदनात दिला. "हनुमान चालीसा वाजवली म्हणून त्या खासदार भगिनीला जेलमध्ये टाकून दिलं 12 दिवस. कंगणा राणौतसाठी 80 लाख खर्च करुन तिचं घर पाडायला लावलं. त्यावेळेस किती काय झालं पण आम्ही काही केलं नाही. आम्ही सूडबुद्धीने वागलो नाही," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> 'फडणवीस मराठा समाजाविरोधात नाहीत!' CM शिंदे जरांगेंचा उल्लेख करत म्हणाले, 'कोणीही...'

सूडबुद्धीने कारवाई करणार नाही

"माझं एवढं म्हणणं आहे की जे काही आहे ते समोर आलं पाहिजे. एसआयटी आपण नेमू. त्या माध्यमातून जे सत्य आहे ते बाहेर येईल. त्याची चौकशी होईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल. सूडबुद्धीने कोणावरही कारवाई केली जाणार नाही. मराठा आरक्षणामध्ये कुठपर्यंत राजकीय भूमिका घेतली पाहिजे हे ठरवलं पाहिजे. कोणीही माणूस असेल तो खालच्या पातळीवर बोलू लागला, एकेरी बोलू लागला, खोटे नाटे बोलू लागला तर त्याला पाठीशी घालता कामा नये. देवेद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी आरक्षण दिलं होतं. ते मराठा समाजाविरोधात नाहीत. मराठा समाजाविरोधात ते कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. सरकार म्हणून आम्ही एकत्र बसून निर्णय घेतलाय. कृपया यात राजकारण आणू नये," असं मुख्यमंत्री म्हणाले. 

नक्की वाचा >> "माझ्याबद्दल सुद्धा बोलला आहे तो आणि नसेल बोलला तर..'; CM शिंदेंकडून जरांगेंचा एकेरी उल्लेख

आधीच्या सरकारांनी आरक्षणापासून वंचित ठेवलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूर्वीच्या सरकारांनी आरक्षण देण्याची संधी असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही असंही म्हटलं आहे. "आरक्षण देण्याची संधी होती काही लोकांना मग त्यांनी का दिलं नाही आरक्षण? मराठा समाज मागास असतानाही त्यांना आरक्षण दिलं नाही. त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं. मराठा समाजाच्या जीवावर अनेक लोक मोठे झाले पण त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं," असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लागवला.