'फडणवीस मराठा समाजाविरोधात नाहीत!' CM शिंदे जरांगेंचा उल्लेख करत म्हणाले, 'कोणीही...'

CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Issue: मनोज जरांगे पाटलांच्या विधानांसंदर्भात चौकशी करण्यासाठी एसआयटीच्या स्थापनेबद्दलही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टीकेल असंही पुन्हा अधोरेखित केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 27, 2024, 01:17 PM IST
'फडणवीस मराठा समाजाविरोधात नाहीत!' CM शिंदे जरांगेंचा उल्लेख करत म्हणाले, 'कोणीही...' title=
मुख्यमंत्र्यांच विधानपरिषदेत भाषण

CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Issue: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपांवरुन टीका केली. खोटे आरोप करणाऱ्यांना कोणीच पाठीशी घालू नये असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन खरोखरच समाजासाठी होतं तेव्हा अगदी मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपासून अधिकारीही तिथे जाऊन त्यांना भेटून आले. मात्र त्यांच्या भाषेला आणि वक्तव्यांना राजकीय वास येऊ लागल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात नाहीत म्हणूनच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, असंही मुख्यमंत्री म्हणाले. एसआयटी चौकशीमध्ये कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही असंही शिंदे म्हणाले.

आरक्षण टिकणार नाही याची कारण आहेत का कोणाकडे?

"खालच्या सभागृहातही यावर (मनोज जरांगे पाटीलांनी केलेल्या आरोपाच्या विषयांवर) चर्चा झाली. आपण मराठा समाजाला टीकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय न करता निर्णय सरकारने घेतला होता. त्याप्रमाणे मराठा आरक्षण आपण दिलं.
एकमताने आपण मराठा आरक्षण दिलं. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण ते आरक्षण दिलं. आपण सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने ठरवलं की दुसऱ्या कुठल्याही समाजाला धक्का न लावता आपण आरक्षण दिलं. आरक्षण दिल्यानंतर आरक्षण टिकाणार नाही अशी चर्चा बाहेर सुरु केली. आरक्षण टिकणार नाही याची कारण आहेत का कोणाकडे? तर कारण नाहीत," असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

56 मोर्चे शांततेत झाले

"माझं सभागृहाला सांगणं आहे, गेले अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता. अनेक आंदोलनं झाली. 56 मोठेमोठे मोर्चे या ठिकाणी झाले. अतिशय शांतते हे मोर्च शिस्तबद्ध पद्धतीने झाले. एवढ्या शिस्तीत मोर्चे निघाल्याचं संपूर्ण जगाने पाहिले. मराठा समाज संयमी आहे. मराठा समाज शिस्तीने वागणारा आहे अशाप्रकारं चित्र या मोर्चातून दिसलं," अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.

नक्की वाचा >> 'जरांगे सतत मागण्या बदलत राहिले'; शिंदेंचा दावा! सरकारने मराठ्यांसाठी काय केलं पाढाच वाचला

शंका निर्माण करण्याचं कारण काय? 

"देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण हायकोर्टात टिकलं. सुप्रीम कोर्टातही फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत आरक्षण रद्द झालं नाही. कोर्टासमोर नंतर ज्या बाबी समोर आणायला पाहिजे होत्या. मराठा समाज मागास आहे हे कोर्टासमोर मांडायला हवं होतं. दुर्देवाने ते झालं नाही. मग कोर्टाने निर्णय दिला. देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपद असताना आम्ही आरक्षण दिलं. दिलेलं आरक्षण कसं टिकेल? कसं टिकलं पाहिजे याचा एकमताने निर्णय घेतला. मग त्यात शंका निर्माण करण्याचं कारण काय? मग समाजात संभ्रम निर्माण करणे, अस्वस्थता निर्माण करणे असा हेतू आहे का कोणाचा?" असा प्रश्न शिंदेंनी विचारत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारला आरक्षण टिकवता आलं नाही असं अधोरेखित केलं.

कोणताही समाज असता तरी...

"मी एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो अशी हिंमत मी दाखवली. माझी भूमिका प्रमाणिक आहे. मी जे बोलतो ते करुन दाखवतो. खोटं आश्वासन देणार नाही. इतर समाजाच्या आरक्षणाचा धक्का न लावता आरक्षण देणार हे काम सुरु होतं म्हणून मी हे बोललो. इतर दुसरा कोणाताही समाज असता तरी मी हेच केलं असतं," असंही शिंदे म्हणाले.  

नक्की वाचा >> मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 'त्या' वक्तव्यांप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिले SIT चौकशीचे आदेश

एसआयटीबद्दलही केलं विधान

"एसआयटी आपण नेमू. त्या माध्यमातून जे सत्य आहे ते बाहेर येईल. त्याची चौकशी होईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल. सूडबुद्धीने कोणावरही कारवाई केली जाणार नाही. मराठा आरक्षणामध्ये कुठपर्यंत राजकीय भूमिका घेतली पाहिजे हे ठरवलं पाहिजे. कोणीही माणूस असेल तो खालच्या पातळीवर बोलू लागला, एकेरी बोलू लागला, खोटे नाटे बोलू लागला तर त्याला पाठीशी घालता कामा नये. देवेद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी आरक्षण दिलं होतं. ते मराठा समाजाविरोधात नाहीत. मराठा समाजाच्याविरोधात ते कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. सरकार म्हणून आम्ही एकत्र बसून निर्णय घेतलाय. कृपया यात राजकारण आणू नये," असं मुख्यमंत्री म्हणाले.