"माझ्याबद्दल सुद्धा बोलला आहे तो आणि नसेल बोलला तर..'; CM शिंदेंकडून जरांगेंचा एकेरी उल्लेख

CM Eknath Shinde On Manjor Jarange Patil: जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली आणि मुख्यमंत्र्यांवर नाही या संदर्भात बोलताना शिंदेंनी, "एकावर आरोप करायचे, दुसऱ्याला सेफ ठेवायचं ही स्टॅटर्जी कोणाची? मी घेतलेले सर्व निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करुन घेतले आहेत," असंही म्हटलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 27, 2024, 03:26 PM IST
"माझ्याबद्दल सुद्धा बोलला आहे तो आणि नसेल बोलला तर..'; CM शिंदेंकडून जरांगेंचा एकेरी उल्लेख title=
मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिलं निवेदन

CM Eknath Shinde On Manjor Jarange Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानपरिषदेमध्ये उघडपणे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच अनेक नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन कठोर शब्दांमध्ये आक्षेप नोंदवला. विरोधीपक्ष नेते आंबादास दानवेंनी चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील फडणवीसांवर टीका करतात मात्र शिंदेंबद्दल काही बोलत नाहीत असा संदर्भ दिला होता. हाच संदर्भ घेत एकनाथ शिंदेंनी टीका करतानाचा हा फरकच जरांगेचं बोलणं ही कोणाची तरी योजना असल्याची शंका वाटावं असं असल्याच्या अर्थाचं विधान केलं. 

असं कधी चालतं का?

मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्यांनुसार सरकारने मागील काही महिन्यांमध्ये अगदी कुणबी प्रमाणपत्रांपासून बरचं काम केल्याची माहिती दिली. "ज्या पद्धतीने सरकारने मराठा समाजासाठी काम केलं ते स्वीकारण्याऐवजी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री म्हणून माझी पण काय काढायची ती काढली. उपमुख्यमंत्र्यांबरोबरच इतर मंत्र्यांनाही बोलले. असं कधी होतं का? असं कधी चालतं का?" असा सवाल उपस्थित केला. 

ही भाषा कार्यकर्त्याची नाही

"एकेरी पद्धतीने बोलणं. या सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींवर अगदी खालच्या पातळीवर आरोप केला. त्यांना विष देऊन मारणार आहेत. हे अशाप्रकारचं वक्तव्य होऊ लागलं. तेव्हा मी पत्रकार परिषदेतही बोललो की ही भाषा कार्यकर्त्याची नाही. ही भाषा राजकीय भाषा आहे. या मागे कोण आहे?" असंही शिंदेंनी विचारलं.

नक्की वाचा >> मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण टिकणारच; शिंदेंना विश्वास! म्हणाले, 'कुठल्याही कोर्टात..'

आमच्यात दुफळी होणार नाही

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंच्या विधानाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात दुफळी निर्माण होणार नाही असं सांगितलं. "आंबादास आता तुम्ही म्हणालात की ते मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत नाहीत ते यांच्याबद्दल (उपमुख्यमंत्र्यांबद्दल) बोलत आहेत. आमच्यामध्ये काही दुफळी होणार नाही," असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. "माझ्याबद्दल सुद्धा बोलला आहे तो आणि नसेल बोलला तर सरकार म्हणून आमची एकत्रित जबाबदारी आहे. हे देखील मनोज जरांगे-पाटील यांच्या तोंडून जे येतंय ते ऐकून का नाही बोलणार हे लोक (भाजपाचे नेते) की ही स्टॅटर्जी कोणाची आहे? एकावर आरोप करायचे, दुसऱ्याला सेफ ठेवायचं. मी घेतलेले सर्व निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करुन घेतले आहेत," असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं.

नक्की वाचा >> 'फडणवीस मराठा समाजाविरोधात नाहीत!' CM शिंदे जरांगेंचा उल्लेख करत म्हणाले, 'कोणीही...'

हे सरकार काम टाळणार नाही

"आज आपला  महाराष्ट्र पुरोगामी आहे. सगळ्या जाती, समाज इथे एकत्र राहतात, एकत्र काम करतात. जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही. आम्हाला कळलं ते म्हणून ओबीसी बांधवांना सांगितलं की सरकारवर विश्वास ठेवा, तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. एकनाथ शिंदे खोटं बोलून कोणालाही फसवणार नाही. काम टाळण्यापुरतं कुठलंही काम सरकार करणार नाही," असा शब्द मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं.