१५ महिलांशी लग्न करुन फसवणूक करणारा लखोबा पोलिसांच्या जाळ्यात

मॅट्रिमोनी साईट्सवर माहिती देताना सावधान...

Updated: Dec 7, 2019, 10:01 PM IST
१५ महिलांशी लग्न करुन फसवणूक करणारा लखोबा पोलिसांच्या जाळ्यात title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : पंधरा महिलांशी लग्न करणारा एक लखोबा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. विवाह विषयक माहिती असलेल्या संकेतस्थळावरून घटस्फोटीत महिला, विधवा महिला आणि विवाहेच्छुक महिलांना लग्नाचे आमिष दाखवत पैसे उकळून फसवणूक करत होता. त्यास पीडित महिलांच्या मदतीनेच नाशिक पोलिसांनी संशयित आरोपी संपत दरवडे याच्या मुसक्या आवळल्या. 

संपत दरवडे हा मूळचा नगर येथील तळवाडे गावातील राहणारा आहे. सध्या पुणे येथील हडपसर येथे राहत होता. मात्र त्याचा मुक्काम आता पोलीस कोठडीत झाला आहे. महिलांना लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांची फसवणूक करायचा. घटस्फोटीत महिलांचा शोध घेण्यासाठी संपतने मॅट्रिमोनी संकतेस्थळावर खातं उघडलं होतं. नाशिकमध्ये अशाच एका महिलेला भेटण्यासाठी आला होता. त्याचवेळी पोलिसांनी सापळा रचत त्याच्या मुसक्या आवळल्या. 

२०१५ मध्ये पुण्यात काम करणाऱ्या घटस्फोटित महिलेशी त्याची ओळख झाली. त्यांची जवळीक वाढली, लग्न केल्यास आर्थिक मदत देण्याचं सांगून ५० हजार रुपये या महिलेने दिले. याच प्रकरणातून त्याला पैसे कमविण्याची नामी युक्ती सापडली. 

दरम्यान, फसवणूक करणाऱ्या या लखोबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी महिलांनी विवाह विषयक माहिती भरतांना आणि त्यावर संवाद करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. याशिवाय अशा वेबसाईटवर सायबर पोलिसांनी नजर ठेवण्याची गरज व्यक्त होते आहे.