तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."

Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.     

शिवराज यादव | Updated: Jul 3, 2023, 02:00 PM IST
तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..." title=

Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही मागणी आता जोर धरु लागली आहे. मनसे पक्षातीलच काही नेते, पदाधिकारी यासाठी राज ठाकरेंना आवाहन करत आहेत. एकीकडे शिवसेना भवनाबाहेर यासाठी पोस्टर लावण्यात आले असताना, दुसरीकडे मनसेच्या बैठकीतही काहींनी ही मागणी केली. मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीत काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं. 

अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारत सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेच्या काही नेत्यांनी पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र यावं असं मत मांडलं. कार्यकर्त्यांच्याही तशा पद्धतीच्या भावना आहेत असं मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं. 

राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

 

दरम्यान या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंना तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची मागणी केली जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी काहीही स्पष्ट बोलण्यास नकार दिला. मी महाराष्ट्राचा दौरा करणार असून, मेळावादेखील घेणार आहे. यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन असं त्यांनी सांगितलं. 

मी आगामी काळात मेळावा घेणार आहे. मला महाराष्ट्राशी बोलायचं आहे. यासंदर्भात पुढील काही दिवसांमध्ये माझा महाराष्ट्राचा दौराही लवकरच सुरु होणार आहे. त्यावेळी मी लोकांची भेट घेणार आहे अशी माहिती यावेळी राज ठाकरेंनी दिली. 

शिवसेना भवनासमोर पोस्टर

शिवसेना भवनासमोर पोस्टर लावत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. आता तरी एकत्र या अशी आर्त हाक या पोस्टरमधून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसे कार्यकर्त्याने शिवसेना भवन परिसरात हे बॅनर लावले आहेत. 

मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी साद घालण्यात आली आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. 

"महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला, राजसाहेब - उद्धवसाहेब आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. एका महाराष्ट्रसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती," असं लक्ष्मण पाटील यांनी या बॅनरवर लिहिलं आहे. 

"राजकारण किळसवाणं होच चाललं आहे"

"महाराष्ट्रात गेल्या दोन अडीच वर्षांपासून जे राजकारण सुरु झालं आहे ते दिवसेंदिवस किळसवाणं होत चाललं आहे. या लोकांना मतदारांशी काही देणं घेणं नाही. प्रत्येक पक्षाचे पारंपारिक मतदार असतील ते का त्यांचे मतदार होते, याचा सगळ्यांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल त्या प्रकारे तडजोड केली जात आहे. महाराष्ट्रात पेव फुटलं असून लोकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

शरद पवारांना उद्धव ठाकरेंचं ओझं उतरवायचं होतं असा आरोप होत असल्यासंबंधी राज ठाकरे म्हणाले, "अर्थातच...शरद पवार संबंध नाही नाही म्हणत असले तरी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल असेच पाठवल्याशिवाय जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कशाचं कशाला सोयरसूतक राहिलेलं नाही".