राणेंच्या 'चिखलफेकी'नंतर चंद्रकांत पाटील पीडित अभियंत्याच्या घरी

कणकवलीत नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर बादलीभर चिखल ओतून त्यांना बांधून ठेवलं होतं

Updated: Jul 5, 2019, 08:33 PM IST
राणेंच्या 'चिखलफेकी'नंतर चंद्रकांत पाटील पीडित अभियंत्याच्या घरी  title=

पुणे : कणकवलीत झालेल्या 'चिखलफेक' प्रकरणानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील पीडित उप-अभियंत्याच्या घरी दाखल झाले. पीडित उप अभियंते प्रकाश शेडेकर यांच्या पुण्यातील राहत्या घरी भेट घेऊन चंद्रकांत पाटलांनी शेडेकर कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी, त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्यासोबत झालेल्या हिंसक घटनेचा निषेधही केला. गुरुवारी कणकवलीत नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर बादलीभर चिखल ओतून त्यांना बांधून ठेवण्याचा प्रकार घडवून आणला होता. 

सिंधुदुर्गातील कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांसंबंधी तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं... यासाठी गुरुवारी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना जबाबदार धरून त्यांच्या अंगावर बादलीभर चिखल ओतण्यात आला. शेडेकर यांना गडनदीवरील पूलापासून जाणवली येथील पुलापर्यंत चालवत नेऊन त्यांना तिथं काही वेळ दोरीनं बांधूनही ठेवण्यात आलं.   

दरम्यान, या प्रकरणी आमदार नितेश राणे यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. न्यायालयाने नितेश यांच्यासह त्यांच्या १८ समर्थकांची रवानगी ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. या प्रकरणात नितेश यांना जामीन मिळेल, असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. परंतु, न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केल्याने समर्थकांना मोठा धक्का बसला.