मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीला खुला

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. ५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 3, 2017, 07:48 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीला खुला title=

मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. ५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.

या नव्या पुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

महाडजवळील मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील बांधलेला ब्रिटिशकालीन पूल १ ऑगस्टच्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेला होता. या दुर्घटनेत एकूण ४२ जणांचा बळी गेला. दोन एसटी आणि खासगी दोन कार वाहून गेल्या होत्या.

या दुर्घटनेला बरोबर दहा महिने होत असतानाच निविदा निघाल्यापासून सहाच महिन्यांत नवा पूल बांधण्यात आलाय. पूल उभारण्याचे १८० दिवसांचे उद्दिष्ट असताना १६५ दिवसांमध्ये पूर्ण करण्याची कामगिरी केंद्रीय मंत्रालय आणि राज्याच्या बांधकाम खात्याने केली.

 १५ जून २०१७ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्याची अटच त्यामध्ये घालण्यात आली होती. सावित्रीवरील नव्या पुलाची एकूण लांबी २३९ मीटर असून एकूण रुंदी १६ मीटर आहे.  तर उंची  १०१-०५ मीटर आहे. या पुलाला ३५ कोटी ७७ लाख रुपये खर्च आला.