मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या भाविकांचा खोळंबा

Mumbai Goa highway Traffic: सलग दुसऱ्या दिवशी चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. शनिवारचा वर्किंग डे उरकून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकण मार्गे निघाले आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Sep 17, 2023, 09:40 AM IST

Mumbai Goa highway Traffic: मुंबईतून मोठ्या प्रमाणावर भाविक गणेशोत्सवासाठी कोकणात निघाले आहेत. पण 12 तास उलटूनही त्यांना अजून घर गाठता आलेले नाही. मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. 
नागोठणे नजिक वाकण फाटा येथे वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे गाड्या मंद गतीने चालत आहेत. वाकण ते नागोठणे पर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. पण यासाठी आणखी मोठा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

सलग दुसऱ्या दिवशी चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. शनिवारचा वर्किंग डे उरकून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकण मार्गे निघाले आहेत. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.  गणपतीच्या स्वागतासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात येतात. चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.

चाकरमान्यांची मोठी संख्या पाहता गणपती स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. याअनुशंगाने गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरती 325 हून अधिक फेऱ्या होत आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे कडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजन करण्यात आले आहे.दोन दिवस अगोदरच चाकरमानी कोकणात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. कोकणात येणाऱ्या सर्वच ट्रेन हाउसफुल झाल्या आहेत. साधारण सहा ते सात लाख भाविक गणेशोत्सव ट्रेनने कोकणात जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

दिवा स्थानकावर गर्दी

यंदा गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने प्रथमच दिवा ते रत्नागिरी दिवा अशी मेमू ट्रेन सुरू केलीय.13 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या मेमु सेवेला कोकणातील चाकरमानी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय..सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी ही मेमु दिवा स्थानकातून रवाना झाली. रेल्वे फलाटावर तर गर्दी आहेच मात्र रुळांवर सुदधा प्रवशी उतरून मेमुत चढण्यासाठी तयार आहेत..कोकण रेल्वे असेल किंवा मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडण्यात आल्यात मात्र त्यासुद्धा कमी पडतायत हेच या दृष्यातून दिसून येतंय..कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर ठाणे इथल्या चाकरमान्यांना मेमु सोयीची असल्याने गावी जाण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याच दिसून येतंय..इतकी गर्दी की पोलिसांना आवरतानाही नाकी नऊ येत होते..अखेर पोलिसांच्या प्रयत्नाने गर्दी नियंत्रित करत प्रवाशांनी खचाखच भरलेली मेमु दिव्यातून रवाना..अजूनही अनेक चाकरमानी अन्य ट्रेनच्या प्रातिक्षेत दिवा स्थानकावर आहेत.