गणपती विसर्जन तलावात, पाण्यातील ऑक्सिजन पातळीत मोठी घट

गणपती विसर्जनानंतर नागपुरातील तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमालीची घसरली आहे. ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या तपासणीत हे वास्तव समोर आले आहे.  

Updated: Sep 14, 2017, 10:12 PM IST
गणपती विसर्जन तलावात, पाण्यातील ऑक्सिजन पातळीत मोठी घट title=

जितेंद्र शिंगाडे/नागपूर : गणपती विसर्जनानंतर नागपुरातील तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमालीची घसरली आहे. ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या तपासणीत हे वास्तव समोर आले आहे. पाण्यातील ऑक्सिजन पातळी घसरल्याने तलावातील जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

नैसर्गिक जलाशायांना प्रदुषणापासून वाचवण्यासाठी गणपती उत्सवात गणेश विसर्जनासाठी नागपूर महापालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. पालिकेने शहरातील सोनेगाव, अंबाझरी आणि गांधीसागर तलावांत मूर्ती विसर्जनावर बंदी होती. त्यामुळे विसर्जनाचा भार एकट्या फुटाळा तलावावर आला. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत चारपट अधिक मूर्तींचे विसर्जन झालं. मूर्तींना लावण्यात आलेले रंगही पाण्यात मिसळल्यानं पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण तर घटलंच, शिवाय पाणीही गढूळ झाले आहे. पाण्याची PH पातळी ८.५ वरून ८.२ वर आली आहे. पाण्यातल्या ऑक्सिजनची पातळी दोन मिलीग्राम पेक्षा कमी झाल्यास पाण्यातील जलचरांचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका उद्भवतो. 

शहरातील इतर तलावांच्या तुलनेत सोनेगाव तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण विसर्जनापूर्वी आणि नंतरही ४.५ मिलीग्राम राहिले आहे. तर विसर्जन न होताही गांधीसागर तलावातील ऑक्सिजनची पातळी समाधानकारक नसून प्रती लिटरवर ४ मिलीग्राम एवढी आहे.

या प्रदूषित जलाशयातील मासे खाल्याने आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. तलावांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर यावर कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्यक आहे.