VIDEO : तिनं काय लिहिलंय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आरशाची गरज लागेल

अमरिनची इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद झालीय

Updated: Sep 5, 2018, 03:35 PM IST

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या एका विद्यार्थिनीला एक भन्नाट कला अवगत आहे... आधी तिच्या या कलेमुळे तिचे आई-वडील आणि शिक्षकही तिला ओरडायचे... पण तिनं अभ्यासातही बाजी मारली आणि या कलेतही... अमरिननं लिहिलेलं वाचायचा प्रयत्न केला तर ती नेमकं काय लिहितेय, ते कळणार नाही... पण, हाच मजकूर आरशात पाहिलं की तुम्हाला लगेचच समजेल, काय लिहिलंय ते... 

नागपूरच्या अमरिन खानला उलटं लिहिण्याची अर्थात 'मिरर रायटिंग'ची कला अवगत आहे. सरळ ज्या गतीनं लिहिलं जातं, त्याच गतीनं अमरिन हे मिरर रायटिंग करते. मराठी, हिंदी, इंग्रजीसह अगदी संस्कृत व अरबी भाषेतही अमरिन मिरर रायटिंग करू शकते.

खरंतरं आपली मुलगी सरळ लिहीत नाही म्हणून लहानपणी अमरिनला आईवडील ओरडायचे... त्यासाठी तिला शाळाही बदलावी लागली... पण अमरिन अभ्यासातही हुशार आहे. तिला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के मिळाल्यानंतर अमरिनच्या 'मिरर रायटिंग'ला खऱ्या अर्थानं वाव मिळाला. 

'मिरर रायटर' म्हणून अमरिनची इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद झालीय. इंजिनिंअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमरिननं वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीजमधून अमरिननं मिरर रायटिंगमध्ये पीएचडीही मिळवलीय.