कारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत भोवलं; सुनील केदांरांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

MLA Sunil Kedar : आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर बुधवारी त्यांची सुटका होणार असल्याने मोठया संख्येने त्यांचे कार्यकर्ते सकाळपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर गोळा झाले होते. 

आकाश नेटके | Updated: Jan 11, 2024, 11:23 AM IST
कारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत भोवलं; सुनील केदांरांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : बॅंक घोटाळ्यात शिक्षा झाल्यामुळे आमदारकी रद्द झालेले कॉंग्रेसचे नेते सुनील केदार यांची बुधवारी जामिनावर सुटका झाली आहे. मात्र जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येऊन मोठी रॅली काढत शक्तिप्रदर्शन करणाऱ्या सुनील केदार आणि त्यांच्या सहकाऱ्यां विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री उशिरा धंतोली पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी निर्माण करण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी 22 डिसेंबर रोजी नागपूरच्या न्यायालयाने सुनील केदार आणि इतर पाच आरोपींना शिक्षा सुनावली होती. सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर 28 डिसेंबर पासून ते तुरुंगात होते. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांची कारागृहातून सुटका झाली. तेव्हा कारागृहपासून नागपूरचे संविधान चौकापर्यंत सुनील केदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली होती.

मात्र आता सुनील केदार यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण नागपूर पोलिसांनी सुनील केदार यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये फार गंभीर आरोप केले आहेत. "नागपूर सेंट्रल जेलमध्ये अनेक जहाल नक्षलवादी आणि काही दहशतवादी कैदेत आहे. असे असतानाही सुनील केदार यांची काल जेलमधून सुटका होताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जेलच्या समोरील परिसरात गर्दी केली होती. एक दिवस आधीच सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी गर्दी करण्यात येऊ नये अशी सूचना पोलिसांनी दिली होती. तरी देखील गर्दी करून घोषणाबाजी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जेल परिसर संवेदनशील असून त्या ठिकाणी असे कृत्य करण्यात येऊ नये असे सांगूनही केदारांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी करत घोषणाबाजी केली," असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

सुनील केदार हे कारगृहामधून बाहेर येताच कारच्या सनरूफमधून बाहेर निघून कार्यकर्त्यांना जेल समोरच अभिवादन करत होते. त्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी त्यांची कार थांबून सुनील केदार यांना हार घातले, असा सर्व तपशीलसुद्धा पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवला आहे.