मन सून्न करणारी घटना! दुचाकीवरुन प्रवास करताना आईच्या कुशीतून पडली, 10 महिन्यांच्या लेकीचा मृत्यू

नाशिकमध्ये दुचाकीने चांदगिरी येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले असताना एका अपघातात दहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. या अपघातात चिमुरडीची आई आणि मामा किरकोळ जखमी झाले आहेत. 

Updated: Jun 20, 2023, 07:53 PM IST
मन सून्न करणारी घटना! दुचाकीवरुन प्रवास करताना आईच्या कुशीतून पडली, 10 महिन्यांच्या लेकीचा मृत्यू title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये एक मन सून्न करणारी घटना घडली आहे. एक महिला आपल्या दहा महिन्यांच्या मुलीसह दुचाकीवरुन प्रवास करत होते. पण दुर्देवाने त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात आईच्या कुशीत असलेल्या दहा महिन्याच्या बालिकेचा खाली पडून  मृत्यू (Death) झाला. ज्ञानेश्वरी उर्फ हिंदवी अमोल वारुंगसे असं बालिकेचे नाव आहे. 16 जूनला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात (Accident) नाशिकच्या (Nashik) चांदगिरी-शिंदे रस्त्यावरील जाखोरी फाट्याजवळ (Jakhori Fata) झाला. ज्ञानेश्वरीच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कसा झाला अपघात?
गायत्री वारुंगसे या कुटुंबासोबत सिन्नर तालुक्यातील सोनारी इथं राहतात. त्या काही दिवसांपूर्वी मुलगी ज्ञानेश्वरी सोबत शिंदे गावात राहणाऱ्या मामांकडे आल्या होत्या. शक्रवारी चांदगिरी (Chandgiri) इथं राहणाऱ्या नातेवाईकांना भेटायला जाण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे शक्रवारी आई गायत्री, मामा शुभम बेरड आणि दहा महिन्याची भाची ज्ञानेश्वरीला सोबत घेऊन तिघंही दुचाकीवर (Motor Cycle) चांदगिरी कडे रवाना झाले. नातेवाईकांची भेट घेऊन संध्याकाळी त्याच दुचाकीने त्यांनी परतीचा प्रवास केला. दिवसभर फिरायला मिळाल्याने ज्ञानेश्वरी खूप खुश होती. गाडीवर प्रवास करत असताना आईने ज्ञानेश्वरीला कुशीत घेतलं होतं. काही किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर वाटेतच जाखोरी फाट्याजवळ अचानक त्यांच्या दुचाकी समोर एक गाडी आडवी आली आणि मामाने अचानक ब्रेक दाबला. 

यावेळी गाडीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्यावर पडली आणि गाडीवरील ज्ञानेश्वरी, गायत्री आणि मामा शुभमही खाली पडले. यात आईच्या कुशीत असलेली ज्ञानेश्वरी खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी (Injured) झाली. तर आई गायत्री आणि मामा शुभम किरकोळ जखमी झाले. ज्ञानेश्वरीला गंभीर दुखापत झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारापूर्वीच ज्ञानेश्वरीचा मृत्यू झाला होता. ज्ञानेश्वरी मृत झाल्याचं सांगतच तिच्या आईने एकच टाहो फोडला. 

सोनारी गावात शोकाकूल वातावरण

ज्ञानेश्वरी ही सर्वांची लाडकी होती, तिच्या अपघाती मृत्यूमुळे वारुंगसे परिवारावर दुखांचा डोंगर कोसळला आहे. तर सोनारी गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात सोनारी गावात ज्ञानेश्वरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अपघात प्रकरणी सिन्नर (Sinner) एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.