नाशिक शहरात पुन्हा गॅस गळतीची घटना, दोन जण जखमी... नागरिक संतप्त

Nashik Gas Leakage : गॅस गळतीची घटना नाशिक शहरात पुन्हा घडली आहे. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

राजीव कासले | Updated: Jan 2, 2024, 10:01 PM IST
नाशिक शहरात पुन्हा गॅस गळतीची घटना, दोन जण जखमी... नागरिक संतप्त title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात गॅस गळतीच्या (Gas Leak) घटनेत वाढ झाली आहे. रविवारी रात्री  नाशिक (Nashik) शहरातील इंदिरानगर परिसरात असलेल्या वक्रतुंड पार्सल पॉईंट इथं गॅस गळती झाली.  सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मालक सुरेश लहामगे यांनी दुकान उघडले यावेळी त्यांच्या सोबत रिक्षाचालक  संदीप पालेकर सुद्धा होते. या घटनेत दोघ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) उपचार सुरू आहेत. 

अशी घडली घटना 
सोमवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मालक सुरेश लहामगे यांनी त्यांचे इंदिरानगर मधील कला नगर परिसरात असलेले वक्रतुंड पार्सल पॉईंटचे दुकान उघडल. या दुकानात रात्री गॅस गळती झाली होती. लहामगे यांनी दुकान उघडल्यानंतर गॅसचा वास येत होता. त्यांच्या सोबत असलेले रिक्षाचालक संदीप पालेकर यांनी गॅसच बटन बंद केलं त्याचवेळी गॅसचा भडका उडाला असल्याची माहिती पालेकर यांनी पोलिसांना दिली आहे. हा भडका इतका मोठा होता की दुकानातील शेगडी आणि लहामगे आणि त्यांच्यासोबत असलेले रिक्षाचालक हे दोघेही लांब पर्यंत फेकले गेले. 

पोलिसांनी वर्तवला हा अंदाज 
पार्सल पॉईंट मध्ये गॅस गळती झाल्याने रात्रभरात गॅस जमा झाला असावा. आणि सकाळी दुकान उघडल्यानंतर लाईट चालू करण्यासाठी इलेक्ट्रिकचे बटन दाबल्याने हा भडका झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही व्यकसायिक सिलेंडर असलेल्या गॅस कंपनीकडून याची चौकशी केली जाणार आहे. 

नागरिकांनी व्यक्त केला संताप
गॅस गळतीमुळे भडका उडल्याच्या अनेक घटना आता पर्यंत घडल्या आहेत. या घटनेत काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. ही गॅस गळती सिलेंडर जुने झाल्याने होत असल्याचा आरोप सर्व सामान्य नागरिक करत आहे. गॅस सिलेंडर पुरवणारी कंपनी वर्षानुवर्षे एकच सिलेंडर वापरत असून सिलेंडरचे नोझल खराब होत आहे.  गॅसचे रेग्युलेटर लागत नसल्याने गॅस गळती होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.