नववी-अकरावीत नापास झालेल्यांना पुन्हा संधी, अशी होणार परीक्षा

नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये जायची आणखी एक संधी आहे.

Updated: Jul 23, 2020, 12:21 AM IST
नववी-अकरावीत नापास झालेल्यांना पुन्हा संधी, अशी होणार परीक्षा title=

मुंबई : नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये जायची आणखी एक संधी आहे. राज्यातल्या नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षा घेऊन, या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ७ ऑगस्टपर्यंत या परीक्षा घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे पुनर्परीक्षेची संधी दिली जाते, त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये नववीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जून २०१८मध्ये पुनर्परीक्षेची संधी देण्यात आली होती. या पुनर्परीक्षे करता मूल्यमापन पद्धती इयत्ता नववी करता असलेल्या सरासरी पद्धतीप्रमाणे ठेवण्यात आली होती. 

चालू वर्षी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमवीर अशाप्रकारची फेरपरीक्षा घेणे शक्य होणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात एक संधी देण्याची बाब शासनाच्या विचारात होती.