Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव

Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.

Updated: Dec 30, 2022, 01:25 PM IST
Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव title=
Rahul-Narvekar

No Confidence Motion : अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session) शेवटच्या दिवशीही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. (Maharashtra Political News) काळी टोपी हातात घेत महाविकासआघाडीच्या आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या हल्ल्यात आता महाविकासआघाडीने मोठे पाऊल उचलत विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar )यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे आता यावर विधानसभा सचिव राजेंद्र भागवत काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे.

अविश्वास ठरावाबाबत महाविकास आघाडीतच मतभेद

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांविरोधात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत महाविकास आघाडीतच मतभेद असल्याचं दिसून येत आहे. अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल चर्चा केल्यावर काँग्रेसने अविश्नास ठराव प्रस्ताव दाखल केला. पण हा ठराव तांत्रिक पातळीवर टिकणं अवघड असल्यामुळे अजित पवार यांनी सही केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अविश्वास ठरावावर सध्या तरी तीनही पक्षात एकमत नसल्याचं चित्र आहे. 

महाविकास आघाडीत ताळमेळ, पाहा अजित पवार काय म्हणाले?

त्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबत आपल्याला माहिती नाही, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ताळमेळ नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. अध्यक्षांवर एक वर्षाकरिता अविश्वास ठराव आणता येत नाही, असे अजित पवार म्हणाले. काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर,अनिल पाटील यांनी विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवलं आहे. पण या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नाही.  विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहित नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.  जर माझी संमती असती तर माझी सही असती त्यामुळे उद्या माहिती घेऊन बोलतो, असं पवार म्हणाले. 

विरोधकांना अधिवेशानात बोलू दिले नसल्याचा आरोप

हिवाळी अधिवेशानात विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे आमदार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचे निलंबन

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.