लातुरात महिन्यातून केवळ दोनदाच होणार पाणी पुरवठा

लातूर शहराला सप्टेंबर महिन्यात फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा होणार आहे. 

Updated: Aug 30, 2019, 03:32 PM IST
लातुरात महिन्यातून केवळ दोनदाच होणार पाणी पुरवठा  title=

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : जवळपास ५ लाख लोकसंख्या असलेल्या लातूर शहराला सप्टेंबर महिन्यात फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा होणार आहे. तर ०१ ऑक्टोबरपासून लातूर शहराचा नळाचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे. कारण पावसाअभावी लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरणातील जलसाठा अटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता लातूरला १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे टँकरवर तसेच रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. 

शिक्षणाच्या आदर्श लातूर पॅटर्नमुळे आणि दिग्गज राजकारण्यांमुळे ओळख असलेलं हे लातूर शहर आहे. मात्र १९९३ चा महाप्रलयकारी भूकंप आणि गेल्या काही वर्षांपासून सततचा दुष्काळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामुळे अधिक ओळखला जाऊ लागला. जवळपास ०५ लाख लोकसंख्या असलेल्या लातूर शहराला आता पुढील सप्टेंबर महिन्यात फक्त दोन वेळेसच पाणी पुरवठा केला जाणार आहे. तर ०१ ऑक्टोबरपासून लातूर शहराचा नळाचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे. 

कारण पावसाअभावी लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण कोरडं पडण्याच्या मार्गावर आहे. धरणात फक्त ०५.८४ दलघमी इतकाच मृत पाणी साठ शिल्लक आहे. त्यामुळे लातूरला पुन्हा एकदा रेल्वेने पाणी देण्याची वेळ येणार असून त्यावर लातूर महापालिकेत एका विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आल होतं. यावेळी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. 

जर सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊसच नाही पडला तर ऑक्टोबर महिन्यात लातूरला पुन्हा एकदा पाण्याची रेल्वे येण्याची शक्यता आहे.याबाबतचे सर्व नियोजन झाल्याचे प्रभारी महापौर देविदास काळे यांनी स्पष्ट केलंय. 

उस्मानाबाद येथून रेल्वेने पाणी पुरवठा करणे, माकणीच्या निम्न तेरणा प्रकल्प तसेच घरणी-साकोळ येथील प्रकल्पातील शिल्लक पाणी टँकरने लातूरला आणण्यावर ही इथे चर्चा झाली. रेल्वेने पाणी आणण्यामुळे लातूरची नाचक्की होत असून सरकारने लातूरचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी उजनी धरणाचे पाणी देण्याची मागणी विरोधी पक्षातील काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केली आहे. तर वॉटर ग्रीड मध्ये लातूरला प्राधान्य देण्याची मागणी नगरसेवक इम्रान सय्यद यांनी केली आहे. 

एकूणच सततचा दुष्काळ आणि रेल्वेच्या पाण्यामुळे नाचक्की होत असलेल्या लातूरला उजणी धरणातून बंद पाईप लाईनने मांजरा धरणातून पिण्याचे पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने विशेषबाब हा प्रश्न सोडविल्यास लातूर पाणी संकटातून कायमस्वरूपी मिटू शकतो पण सत्ताधारी भाजपच्या राजकीय इच्छाशक्तीची यासाठी गरज आहे.