हातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

पालघरमधल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या, आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Updated: Feb 1, 2023, 04:21 PM IST
हातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर title=

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर :  गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुलांमध्ये आत्महत्येचं (Suicide) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, नैराश्‍य, व्यसन, प्रेमभंग अशा कारणांमुळे मुलं आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत आहेत. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणवर्गाचं आढळून आलं आहे. तरुण वर्गात संयम उरलेला नाही. पालकांनी रागावलं किंवा प्रेमभंग झाला तरी मुलं जीवन संपवतात. अशीच एक धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणूमध्ये (Dahanu) समोर आली आहे. 

गळफास घेत आत्महत्या
डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलासरीतील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरी इथं एका विद्यार्थ्याने बाथरूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या (Student Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . अॅलेस विनय लखन असं मृत तरुणाचं नाव असून तो 17 वर्षांचा आहे. अँलेस हा मुळचा तलासरी तालुक्यातील सावरोळी उधानपाडा इथला राहाणार आहे. अँलेस हा अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.

नैराश्यातून आत्महत्या
अॅलेसचा मृतदेह महाविद्यालयाच्या वसतीगृहातील बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. वसतीगृह व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी त्याचा अॅलेसचा खाली उतरवत रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांना अॅलेसच्या हातावर अॅलेस डेथ असं लिहिलेलं आढळलं, तसंच व्हॉट आय डू? असंही त्याच्या हातावर लिहिलं होतं. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत प्रेमप्रकरणातून अॅलेसने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला असून या घटनेमुळे आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मोबाईल ठरतोय कारणीभूत
तरुण मुलांच्या आत्महत्येमागे मोबाईल हे प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मोबाईलचा अती वापर, व्यसनाधीनता, रागीटपणा, यामुळे अगदी लहान वयात मुलं आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत आहेत. मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की मुलांची चिडचिड हो आहे. छोट्या छोट्या कारणांमुळे मनात नकारात्मकता वाढत असल्याचं समोर आलं आहे.