दिवाळीनिमित्त 'दगडूशेठ' आणि शिर्डीत भाविकांची गर्दी

दीपावलीनिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात शुभकलशाची सजावट 

Updated: Oct 27, 2019, 08:01 PM IST
दिवाळीनिमित्त 'दगडूशेठ' आणि शिर्डीत भाविकांची गर्दी  title=
संग्रहित फोटो

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आंब्याची पाने, तांब्याचा गडवा, नारळाच्या सजावटीने साकारलेला शुभकलश, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेल्या मंदिरात लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. 

दिवाळीनिमित्त मंदिराचा परिसर आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीच्या पायघडयांनी सजवण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२७व्या वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. 

सलग १५ दिवस ३० कारागिर याकरीता काम करीत होते. जरी वर्कचे कापड, व्हेलवेटचे कापड आणि १५० झुंबरांचा वापर सजावटीमध्ये करण्यात आला आहे. दीपावलीनिमित्त केलेली ही शुभकलशाची सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. 

  

दुसरीकडे, साईंच्या शिर्डीतही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आज हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने साईबाबांच्या नंदादीपसमोर दिवे लावले. भक्तांनी लावलेल्या या श्रद्धेच्या दिव्यांनी संपूर्ण साईमंदिर परिसर लखलखून गेला आहे.

  

साईमंदिरमध्ये पारंपारिक पद्धतीने दिपावळी साजरी केली जाते. कागद आणि बांबूच्या कामट्यापासून तयार केलेला आकर्षक आकाश कंदील साईमंदिर परिसरात लावला आहे. दिवाळीच्या या शुभ मुहर्तावर प्रत्येक जण मोठ्या उत्साहात दिप प्रज्वलीत करून शिर्डीत बाबांच्या सानिध्यात दिवाळी साजरी करतात.