मुसळधार पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात

काढणीसाठी आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे.

Updated: Sep 16, 2020, 02:26 PM IST
मुसळधार पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात title=
संग्रहित फोटो

पुणे : कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर आता बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची ही चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्याभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने बटाट्याचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने, काढणीसाठी आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे. बटाटा काढणी खर्चातही मोठी वाढ झाली आहे. कोरोना संकटाने मजूरांची टंचाई भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे बटाटे पावसामुळे शेतातच सडू लागले आहेत.

पुण्यातल्या 'या' शहारात आजपासून जनता कर्फ्यू

दरम्यान, केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मागील काही दिवसांमध्ये सातत्याने वाढणारे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने निर्यात बंदी लागू केल्याचं म्हटलं गेलं. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट आहे. केंद्र सरकारने अचानकपणे घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची प्रतिमा मलीन होईल. त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान आपल्याला परवडणारे नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. सरकारने आपल्या या निर्णयाचा फेरिवाचार करावा, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे. विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, नेते यांनी एकत्र येत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा स्पष्टपणे विरोध केला आहे.