पुण्याचा बिहार होतोय? पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

Pune Crime : पुणे शहरात कोयता गँगने दहशत कायम असून पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करूनही कोयता गँगची दहशत काय कमी होताना दिसत नाहीए. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने गाड्यांची तोडफोड केलीय

सागर आव्हाड | Updated: May 26, 2023, 09:23 PM IST
पुण्याचा बिहार होतोय? पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याचा बिहार होतोय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. पुण्यातील कोयता गँगची (Koyta Gang) दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा कोयता गँगनं दहशत माजवलीय. वाहनांची तोडफोड करुन हे टोळकं थांबलं नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनाही या गँगनं धमकावलं. हा सर्व प्रकार बिबवेवाडीतील (Bibwewadi) संत निरंकारी सत्संग भवनसमोर घडला. याप्रकरणी बाळू पवार, अभी वाघमारे, विशाल पाटोळे, डुई यांच्यासह आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..

पुन्हा कोयता गँगची दहशत 
याआधीही पुण्यात कोयता गँगच्या दहशतीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हडपसर, सिंहगड रोड, वारजे, विश्रामबाग परिसरात कोयता गँगनं सळो की पळो करुन सोडलं होतं. हातात कोयते घेऊन ही गँग दुकानांमध्ये तोडफोड करायची. रात्री पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करायची.  या गँगनं केलेल्या तोडफोडीत लाखो रुपयांचं नुकसान झालं. पोलिसांकडून तब्बल 3,765 गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली.

दहशत माजण्याचा प्रयत्न
कोयता गँगकडून गाड्या जाळणे, गाड्यांची तोडफोड करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. यासोबत विना पैसे देता जेवण, कपडे किंवा अन्ये गोष्टी मिळवण्यासाठी कोयत्याची दहशत दाखवली जात आहे. यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे.

तरुणाचा पंजा तोडला
मार्च महिन्यात पूर्ववैमनस्यातून कोयता गँगने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. कोयत्याने हल्ला करत टोळक्याने तरुणाचा मनगटापासून पंजाच तोडला होता. पुण्याच्या अत्यंत वर्दळीच्या अशा कात्रज भागात भरदिवसा हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे नागरिकांमध्येही प्रचंड दहशत निर्माण झाली. अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे होतं. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने अखिलेशवर शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांना बक्षिस
याआधी पुणे शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली होती. या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी बक्षिसांची खैरात सुरू केली. जो कर्मचारी कोयता गँगच्या आरोपीला पकडून आणेल त्याला बक्षीस (Reward) म्हणून रोख रक्कम देण्याची घोषणा पुणे पोलिसांनी केली . पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पकडणाऱ्यांना 10 हजार तसेच फरार आरोपी पकडून दिल्यास त्यालाही 10 हजारांचं बक्षीस. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.  तर कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस देण्याची योजना होती. 

पण पोलिसांनी मुसक्या आवळल्या तरी पुण्यात कोयता गँगची दहशत काही कमी होताना दिसत नाहीये. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणं आता क्राईम कॅपिटल बनायला सुरूवात झालीय का, पुण्याचा बिहार होतोय का असे सवाल उपस्थित होतायत..