दबक्या पावलाने आला, मालकाच्या बाजूला झोपलेल्या कुत्र्याला बिबट्या घेऊन गेला... थरार CCTV त कैद

पुणे जिल्ह्याच्या विविध भागात बिबटे दिसण्याचं प्रमाण वाढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

राजीव कासले | Updated: May 17, 2023, 07:27 PM IST
दबक्या पावलाने आला, मालकाच्या बाजूला झोपलेल्या कुत्र्याला बिबट्या घेऊन गेला... थरार CCTV त कैद title=

Leopard Attack Viral Video, Pune: बिबट्याच्या हल्ल्याचा (Leaopard Attacked) एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधला (Junnar) हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय. वाहनांच्या आडोशाने दबक्या पावलाने बिबट्या गाढ झोपेत असलेल्या एका व्यक्तीजवळ आला. त्या व्यक्तीच्या बाजूला झोपलेल्या कुत्र्यावर (Dog) झडप टाकत बिबट्या त्याला घेऊन गेला. कुत्र्याच्या ओरडण्याच्या आवाजाने बाजूलाच झोपलेला त्याचा मालक जागा झाला. ही सर्व घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली असून बिबटच्या वावराने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. 

थरारक घटना सीसीटीव्ही कैद
पुण्यातल्या जुन्नरमधली 15 मे रोजीची ही घटना आहे. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. एका मोकळ्या जागेत ट्रक रांगेत उभे असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. ट्रकच्या समोरच एक व्यक्ती चारपाई टाकून झोपल्याचं दिसत असून त्याच्यापासून काही अंतरावरच एक कुत्रा झोपला होता. त्याचवेळी एक बिबट्या दबक्या पावलाने कुत्र्याजवळ येताना दिसतोय. कसलीच चाहूल न लागता तो कुत्र्याजवळ जातो आणि एका क्षणात कुत्र्यावर झडप मारून त्याला तोंडात पकडतो आणि धूम ठोकतो.

कुत्र्याच्या आवाजाने त्याच्या मालकाला जाग येते आणि तो आवाजाच्या दिशेने पाहतो. बिबट्या कुत्र्याला घेऊन जाताना तो पाहात असल्याचं व्हिडिओत दिसतंय. 

बिबट्याच्या हल्ल्याचा हा थरारक व्हिडिओ नेहा पंचमिया (@neha_panchamiya) नावाच्या अकाऊंटवरुन ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून एका दिवसातच या व्हिडिओला 33 हजार व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडिओबरोबर नेहाने एक पोस्टही लिहिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जंगलं नष्ट होत असल्याने हिंस्त्र जनावरं शहराकडे वळली आहेत. उसाच्या शेतात ते लपतात आणि पोटभरण्यासाठी भटक्या कुत्र्यांना शिकार बनवतात. 

नागरिक धास्तावले
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मंचरमध्ये बिबट्याने सहा फूट उंच सुरक्षा भिंतीवरुन उडी मारत एका बिबट्याची शिकार केली होती. हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.  गेल्या काही दिवसात पुणे जिल्हयाचा विविध भागात बिबट्यांचा वावर वाढला असून यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात किंवा शिकारीच्या शोधात बिबटे शहरी भागाकडे वळले आहेत.