Pune News : नागरिकांनी हे सगळं बंद करावे... कबुतरांना धान्य खायला घालणाऱ्यांना आता 500 रुपये दंड

Pune News : जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी काही जण कबुतरांना धान्य खायला घालतात. पुण्य मिळवण्याच्या उद्देषाने स्वस्तातला उपाय म्हणून लोक हे करतात. अनेक प्राणी मित्रही भूतदया म्हणून कबुतरांची निगा राखतात. मात्र हेच अनेकांच्या जीवावर उठू शकतं

Updated: Mar 13, 2023, 04:39 PM IST
Pune News : नागरिकांनी हे सगळं बंद करावे... कबुतरांना धान्य खायला घालणाऱ्यांना आता 500 रुपये दंड title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : अनेकदा लोक त्यांच्या जीवनात आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. यामध्ये कबुतरांना (pigeons) धान्य खायला टाकायला दिल्याने तुम्हाला पुण्य मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे स्वस्तात पुण्य मिळण्याच्या नादात प्राणीमित्र किंवा असे उपाय करणारे अनेकांचे आयुष्य धोक्यात घालत असतात. मात्र असे करणाऱ्यांना दंड बसणार आहे. पुणे महापालिकेने (PMC) यासंदर्भात निर्णय घेतला आहे. 

त्यामुळे आता कबुतर किंवा पारव्यांना धान्य चारणाऱ्या पक्षीप्रेमींना किमान 500 रुपयांचा भुर्दंड पडू शकतो. पुणे महापालिकेने तसे आदेशच काढले आहेत. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी लोक कबुतरांना धान्य टाकताना आढळतात. त्यामुळे शहरातील कबुतरांची संख्या प्रचंड वाढली आहे. या कबुतरांमुळे मानवी स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कबुतरांच्या विष्ठेतून विविध प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. असे असतानादेखील पक्षीाप्रेमी नागरिक भूतदया दाखवत कबुतरांना धान्य खायला घालतात. वारंवार आवाहन करू नये हे प्रकार थांबत नाहीत. त्यामुळे महापालिकेने अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कबुतरांना धान्य टाकताना आढळल्यास किमान पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

"कबुतराच्या विष्ठेतून जीवाणूंचा प्रसार होऊ शकतो. निसर्गात प्रत्येत प्राण्याच्या आतड्यामध्ये जीवाणू असतात. ते दुसऱ्या प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात. त्यांच्या विष्ठेमध्ये असलेल्या विषाणूमुळे ऍलर्जी असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते. कबुतरामुळे उद्भवलेला प्रश्न त्रासदायक आहे. इमारतीच्या कोपऱ्यामध्ये ही कबुतरे ढाबळी बनवतात तिथे त्यांचे चक्र सुरु असते. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी. काही जण प्राणी मित्र असतात. त्यामुळे काही ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे पक्ष्यांना दाणे टाकत असतात. एकाच जागी अन्न मिळाल्याने त्यांची प्रजनन क्षमता वाढते. तेही नागरिकांनी बंद करावे," असा इशारा पुणे मनपाच्या आरोग्य प्रमुख डॉ कल्पना बळीवंत यांनी दिला आहे.

"मनपा सहायक आयुक्तांना देखील या संदर्भात पत्र दिले आहे. कबुतरांच्या ढाबळी नष्ट करुन त्याच्यावर औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. लेखी आदेश देऊन या सूचना देण्यात आल्या आहेत. पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर विष्ठा केल्यासही दंड आकारला जातो. त्याच धर्तीवर या सूचना देण्यात आल्या आहेत," असे कल्पना बळीवंत म्हणाल्या.