पुणेः हसत्या-खेळत्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, शाळेत खेळताना आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Pune Live News Today: पुण्याच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.   

कैलास पुरी | Updated: Feb 16, 2024, 03:03 PM IST
पुणेः हसत्या-खेळत्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, शाळेत खेळताना आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू title=
pune news today Students die after falling from third floor while playing

Pune News Today: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंवर घसरगुंडी खेळत असताना हा अपघात घडला आहे. अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

काळेवाडीत राहणारा सार्थक हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता. बाराच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. रेलिंगवर तो घसरगुंडी खेळत होता. अशाप्रकार रेलिंगवर खेळणं धोकादायक होतं. याची कल्पना असल्यानं एका मित्राने तू इथं खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल, असं म्हणत रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले.

मित्राने सांगूनही त्याने त्याचे काहीच ऐकले नाही तो त्याच्याच धुंदीत खेळत होता. मात्र अचानकपणे खेळता खेळता त्याचा तोल गेला अन तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये जाऊन पडला. अशी माहिती सार्थकच्या मित्रांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितली आहे. या अपघातात सार्थक गंभीर जखमी झाला आहे. त्याला जोराचा जोराचा मार बसला होता. सार्थक खाली पडल्यानंतर त्याला शाळेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र गंभीर मार बसल्याने सार्थकचा दुर्दैवाने मृत्यू झाला. चिंचवड पोलीसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूंची नोंद केली आहे. तसंच, याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत. 

बांधकाम करताना भिंत कोसळून एक मजूर ठार 

सांगलीच्या मिरजेमध्ये बांधकाम करताना भिंत कोसळून एक कामगार ठार झाला आहे. तर दोन जण जखमी  झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तमन्ना कांबळे असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे. शहरातल्या लोणी बाजार येथे एक चार मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बांधकाम सुरू असताना अचानकपणे भिंत कोसळली. ज्यामध्ये या ठिकाणी काम करणारे तीन मजूर भिंतीखाली गाडले गेले. यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.