Rain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

Rain in Maharashtra :  आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 13, 2023, 11:51 AM IST
Rain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस title=

Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे येत असल्याने राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे.

Mumbai Rain : अवकाळीमुळं मुंबईची तुंबई; विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे  केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळं जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

वाशिम जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळवण्यासाठी ठेवलेली हळद भिजल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी 

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुंबईत पाऊस झालाय. मध्यरात्री मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वा-यामुळे मुंबईत अनेक भागात झाडं पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांवरचे पत्रे उडून गेले. मुंबईच्या सर्वच भागात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, मरोळ, जोगेश्वरी, मालाड, विलेपार्ले परिसरात जोरदार पाऊस झाला. मुंबई विमानतळ परिसरातही तुफान पाऊस झाला. 

मध्यरात्री दीडच्या सुमारास मुंबईत वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, मरोळमध्ये वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. या वादळात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. तर मरोळ भागातील घरांचे पत्रेही उडाले. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले परिसरामध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असताना ठाणे जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. ठाणे शहरात बुधवारी तापमान 43.3 अंश नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराचं तापमान चाळिशी पार गेले आहे.