'देव जाणो, स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून..'; रामनवमीनिमित्त राज ठाकरेंची स्पेशल पोस्ट

Ram Navami 2024 Raj Thackeray Special Post: रामभक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सूचक पद्धतीने राजकीय पक्षांवर निशाणा साधला असून त्यांनी रामाचं महात्म्यही सांगितलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 17, 2024, 09:51 AM IST
'देव जाणो, स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून..'; रामनवमीनिमित्त राज ठाकरेंची स्पेशल पोस्ट title=
राज ठाकरेंची विशेष पोस्ट

Ram Navami 2024 Raj Thackeray Special Post: संपूर्ण देशामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना करण्यात आल्यानंतरही ही पहिलीच रामनवमी असल्याने अयोध्येतही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखोंच्या संख्येनं आज रामभक्त अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशातील नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही एका विशेष पोस्टच्या माध्यमातून रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देताना सूचक पद्धतीने राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे.

पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि...

"श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात  स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम," असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या पोस्टला सुरुवात केली आहे. "भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली," असंही राज यांनी म्हटलं आहे. 

काही पक्षांकडून असं का घडलं, देव जाणो

"देशाला बांधून ठेवणाऱ्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो," असा टोला राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षाचा थेट उल्लेख न करताना लगावला आहे. "धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती," असं राज यांनी म्हटलं आहे. "आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा," असं म्हणत राज यांनी आपल्या पोस्टचा शेवट केला आहे.

मोदींनीही दिल्या शुभेच्छा...

पंतप्रधान मोदींनीही देशातील नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी एक्सवरुन (आधीचं ट्वीटर) केलेल्या पोस्टमध्ये अयोध्येचा उल्लेख केला आहे. "देशभरातील माझ्या कुटुंबियांना भगवान श्री रामांच्या जन्मोत्सवाच्या म्हणजेच रामनवमीच्या अनंत शुभेच्छा. या पवित्र क्षणी माझं मन भावनांनी भरुन आलं आहे. हा कोट्यवधी रामभक्तांचा आशिर्वादच आहे की ज्यामुळे याच वर्षी मी कोट्यवधी भारतीयांच्या साक्षीने अयोध्येमध्ये प्राण-प्रतिष्ठेचा साक्षीदार ठरलो. अवधपुरीमधील त्या क्षणांची आठवण आजही माझ्या मनाला ऊर्जा देत आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

अयोध्येमध्ये आज रामनवमीनिमित्त विशेष अभिषेक आणि पूजा आयोजित करण्यात आली आहे.