रायगडात भाजपाचा काँग्रेसला दणका

शेकाप बरोबरच्या आघाडीनं रवींद्र पाटील काँग्रेसवर नाराज आहेत

Updated: Feb 6, 2019, 10:25 AM IST
रायगडात भाजपाचा काँग्रेसला दणका title=

रायगड : रायगडात भाजपानं काँग्रेसला चांगलाच दणका दिलाय. काँग्रेसवर नाराज असलेले माजी मंत्री रविंद्र पाटील यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थितीत मुंबईतील वर्षा निवासस्‍थानी ते भाजपवासी झाले. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्‍हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते. 

२००४ मध्ये आघाडी सरकारमध्ये रवींद्र पाटील मंत्री होते. पाटील हे दिवंगत बॅरिस्‍टर ए. आर. अंतुले यांचे कट्टर समर्थक होते. पक्षाच्‍या वरीष्‍ठ नेत्‍यांचे जिल्‍हयातील काँग्रेसकडे दुर्लक्ष होत होते. त्‍यातच काँग्रेस - राष्‍ट्रवादीच्‍या आघाडीत पारंपरिक राजकीय शत्रू असलेल्‍या शेकापलादेखील सहभागी करून घेण्‍यात आलंय. त्‍यामुळे पेणची जागा काँग्रेसच्‍या वाटयाला येणार नाही, हे निश्चित झाल्‍यानं रविंद्र पाटील नाराज होते. 

मागील काही महिन्‍यांपासून ते भाजप नेत्‍यांच्‍या संपर्कात होते. रविंद्र पाटील यांच्‍या भाजपा प्रवेशामुळे जिल्‍हयात आधीच कमकुवत असलेल्‍या काँग्रेसची ताकद क्षीण होणार आहे.

मात्र, भाजप सेनेला याचा चांगलाच फायदा होणार आहे. लवकरच पेण इथं हजारो कार्यकर्त्‍यांच्‍या उपस्थितीत रविंद्र पाटील यांचा जाहीर भाजप प्रवेश सोहळा पार पडणार आहे.