सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची कोयत्याने वार करुन हत्या

 खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या

Updated: Feb 2, 2020, 08:56 PM IST
सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची कोयत्याने वार करुन हत्या  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : जिल्ह्यातील खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. कोयत्याने वार करून हल्लेखोर पसार झाले. आनंदराव पाटील यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीयसहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत.

सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये आनंदराव पाटील हे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घराकडे परतत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. 

रक्तबंबाळ अवस्थेत हल्लेखोरांनी त्यांना तेथेच टाकून पलायन केले. आनंदराव पाटील यांच्यावर हाल झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारा साठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. आनंदराव पाटील यांची सध्या प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. 

रुग्णालयाच्या परिसरात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच भिलवडी पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरु आहे. या हल्ल्यामागे राजकीय पार्श्वभूमीवर आहे की अन्य काही याचा तपास आता पोलीस घेत आहेत. तर पाटील हे गंभीर जखमी असल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.