कळवा रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालक गांजा ओढत होते, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा

Kalva Auto Driver Video Viral: कळव्यातील रिक्षाचालकांचा गांजा पितानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांची तात्काळ कारवाई

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 12, 2023, 01:17 PM IST
कळवा रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालक गांजा ओढत होते, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा title=
Shocking Video Of Kalwa Rickshaw Drivers Smoking Drugs outside railway station

विशाल वैद्य, झी मीडिया

Kalva Auto Driver Video Viral: कळवा रेल्वे स्थानकाबाहेरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तीन रिक्षाचालक स्थानकाबाहेर अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी लगेचच सूत्र हाती घेत कारवाई केली आहे. मात्र, दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

कळवा पूर्व परिसरातील रेल्वे स्टेशन जवळच्यच रिक्षा स्टँडवर रिक्षा चालक बिनधास्तपणे नशा करत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. डोंबिवली मध्ये रिक्षा चालकांनी महिलेचे अपहरण केल्याची घटना ताजी असतानाच कळव्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

कळवा रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टँडवर रिक्षा चालक चक्क नशा करत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. हे रिक्षा चालक खुलेआमपणे गांजा ओढत असल्याचा या व्हायरल व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खास करून महिला प्रवासी यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात खुलेआम असे प्रकार घडत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कळवा पोलिसांनी याची दखल घेत तात्काळ अॅक्शन घेत या रिक्षा चालकांचा शोध घेत त्यांना तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणी 3 जणांवर NDPS एक्ट नुसार कारवाई करण्यात आली असून तर त्यांचा चौथा साथीदार फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा कळवा पोलिसांनी दिला आहे. 

शनिवारी रिक्षा स्थानकाजवळ काही तरुण गांजा ओढत असल्याचा व्हायरल व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला होता. त्यानुसार आम्ही एक पथक तयार केले. तरुणांचा शोध घेण्यासाठी आम्ही कळवा रेल्वे स्थानकाजवळ आम्ही शोध घेत असतानाच एका कोपऱ्यात हे तिन तरुण पुन्हा गांजा ओढताना दिसून आले. त्यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे. विनोद गुप्ता, गजानन साळुंखे आणि मोहम्मद शेख अशी तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांना ताब्यात घेतलं असून यासंबंधी अधिक चौकशी करण्यात येत आहे. 

तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौथा साथीदार फरार असून त्याचा शोध घेतला जात असून त्यानेच गांजाचे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवले असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.  हे तिन्ही आरोपी रिक्षा चालक असून कळवा पूर्वेकडेच ते राहतात. त्यांच्याकडे गांजा कुठून आला याची माहिती आम्ही घेत आहोत, असं कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक  कन्हैया थोरात यांनी सांगितलं.