महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती

राजनाथ सिंह यांनीदेखील मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता

Updated: Sep 14, 2020, 12:32 PM IST
महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती  title=

नवी दिल्ली: शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी चांगलाच लावून धरला आहे. यावरून काल त्यांनी शिवसेनेवर टीकाही केली होती. यानंतर सोमवारी नवनीत राणा यांनी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, अशी विनंतीही त्यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली. 

शिवसेनेच्या गुंडगिरीला मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का? नवनीत राणांचा सवाल

यापूर्वी राजनाथ सिंह यांनीदेखील मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. यानंतर राजनाथ सिंह यांनी ट्विट करून, माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच दिला होता. 

... हा तर सरकार पुरस्कृत दहशतवाद; देवेंद्र फडणवीसांची महाविकासआघाडीवर टीका

सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शुक्रवारी ८ ते १० शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. भाजपनेही हा मुद्दा लावून धरला होता.

मात्र, यानंतर संजय राऊत यांनी मदन शर्मा यांच्यावरील हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या.त्यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. तसेच राऊतांप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही शिवसैनिकांच्या गुंडगिरीला समर्थन आहे का, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला होता.