Bhagat Singh Koshyari : कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्यांची चौकशी करण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी

Bhagat Singh Koshyari  : राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्या आणि बेकायदेशीर कारवायांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी केली आहे.  

Updated: Feb 12, 2023, 12:18 PM IST
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्यांची चौकशी करण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी title=
संग्रहित छाया

Bhagat Singh Koshyari Resignation : राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्या आणि बेकायदेशीर कारवायांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी केली आहे. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. (Maharashtra Political News) कोश्यारी यांनी राजभवनचा वापर भाजप कार्यालय म्हणून केला, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे.  त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.  राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला आहे. राज्यपाल कोश्यारी हे अनेक वादग्रस्त वक्तव्यावरुन वादाच्या भोव-यात सापडले होते. तेव्हा कोश्यारींचा राजीनामा घ्या अशी मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि विरोधकांनीही केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 जानेवारीला मुंबई दौरा संपन्न झाला होता. या दौऱ्यानंतर राज्यपाल पद सोडण्याची इच्छा भगतसिंह कोश्यारांनी व्यक्त केली होती. 

कोल्हापुरातून होतोय विरोध

भगतसिंह कोश्यारी यांना कोल्हापूरमधून विरोध वाढतोच आहे. कोश्यारींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारीला कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कृती समितीनं हा बंद पुकारण्याची घोषणा केली आहे. 16 तारखेला शिवाजी विद्यापीठात राज्यपाल दीक्षांत समारंभ सोहळ्यासाठी येणार आहेत. मात्र ठाकरे गटासह आता सर्वपक्षीय कृती समितीने कोश्यारी यांना  कोल्हापुरात येण्यासाठी विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत कोश्यारींना कोल्हापुरात जोरदार विरोध होत आहे.

संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल केला आहे. राज्यपालांनी भाजपचे एजंट म्हणून काम केलं, त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना पायउतार व्हावं लागल्याची टीका राऊतांनी केली. तर नवे राज्यपाल हे बैस आहेत की बायस? त्यांनी घटनेनुसार काम केलं तर स्वागतच आहे असं म्हणत राऊतांनी बैस यांच्यावर उपरोधिक टोला लगावला आहे.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून  घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.