नशा करण्यासाठी ठाण्यातून ६० किलो कांद्यांची चोरी

नशा करण्यासाठी माणूस कोणत्याही पातळीवर जातो.

Updated: Nov 18, 2019, 11:24 PM IST
नशा करण्यासाठी ठाण्यातून ६० किलो कांद्यांची चोरी title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : नशा करण्यासाठी माणूस कोणत्याही पातळीवर जातो. ड्रग्ज घेण्यासाठी ठाण्यातल्या दोन तरुणांनी चक्क ६० किलो कांदा चोरण्याचा प्रयत्न केला. पण कांदा चोरीचा हा प्रयत्न त्यांना थेट गजाआड घेऊन गेला.

कांदा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच भाव खातोय. एरव्ही दुकानाबाहेर असलेल्या कांद्याच्या गोणींकडे दुकानदार लक्ष देत नाही. पण आता दिवस बदललेत. दुकानदार दुकानातल्या वस्तूंपेक्षा कांद्यावर जास्त लक्ष देऊ लागलेत. कारण गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचा भाव वाढलाय. साहजिकच कांद्याचे भाव वाढल्यानं कांद्यावर चोरट्यांची नजर गेली आहे. ठाण्यातल्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याची चोरी होऊ लागली आहे.

महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये कांद्याची गोण घेऊन जाणाऱ्या दोन जणांना गस्तीवरच्या पोलिसांनी हटकलं. त्यांच्याजवळचा ६० किलो कांदा चोरीचा असल्याचं तपासात स्पष्ट झालं. पोलिसांनी अविनाश कदम आणि रितेश पवार या दोन आरोपींना ताब्यात घेतलंय.

कांदा शंभरीच्या घरात पोहचलाय. पन्नास किलोच्या गोणीलाही पाच हजारांचा भाव आहे. नशेबाज चोरलेला पाच हजारांचा कांदा अगदी हजार दोन हजारातही विकत असावेत असा व्यापाऱ्याचा आरोप आहे.

सहसा भाजीबाजाराकडं चोरट्यांची नजर जात नाही. पण गेल्या काही दिवसांत कांद्याला आलेला भाव आणि महाग झालेली भाजी पाहता आता भाजी मार्केटमध्येही वॉचमन ठेवावेत की काय या विचारात व्यापारी आहेत.