तरुणीची बलात्काराची खोटी तक्रार, पोलिसांनी 1000 सीसीटीव्ही चेक केले आणि ही माहिती आली पुढे...

Nagpur Crime​ News : एक धक्कादायक बातमी. एका 19 वर्षीय तरुणीने बलात्काराचा बनाव रचला आणि पोलीस तपासात धक्कादायक माहिती.

Updated: Dec 14, 2021, 10:29 AM IST
तरुणीची बलात्काराची खोटी तक्रार, पोलिसांनी 1000 सीसीटीव्ही चेक केले आणि ही माहिती आली पुढे... title=
संग्रहित छाया

नागपूर : Nagpur Crime News : एक धक्कादायक बातमी. एका 19 वर्षीय तरुणीने बलात्काराचा बनाव रचला. (False allegations of gang rape) तिने सामूहिक बलात्काराची तक्रार केली. मात्र, ही तक्रार खोटी होती, हे तपासाअंती स्पष्ट झाले.  ही गंभीरबाब लक्षात घेऊन नागपूर पोलीस दलातील सुमारे एक हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवसभर तपास करीत होते. त्यांची चांगलीच दमछाक झाली.

सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास एका 19 वर्षीय तरुणीने कळमना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. आपले रामदास पेठ परिसरातून काही आरोपींनी व्हॅनमधून अपहरण केले आणि नंतर कळमना परिसरातील चिखली मैदान या परिसरात नेऊन सामूहिक अत्याचार केला, असे दिलेल्या तक्रारीत नमुद केले.

या तक्रारीनंतर नागपूर शहरातील संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली होती. विविध पोलिस स्टेशनचे अनेक पथक आरोपींच्या शोध कामात लागले होते. डीसीपी, एसीपी आणि पोलीस निरीक्षक स्तरावरील अनेक अधिकारी सह सुमारे 1000 पोलीस कर्मचारी आरोपींचा शोध कामात लागले होते 

पोलिसांनी तरुणीने दिलेल्या तक्रारीतील तपशिलानुसार सुमारे 100 ठिकाणांवरचे 250 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्या तरुणीचे कोणीही अपहरण केलेले नाही आणि ती सांगितलेल्या घटनास्थळापर्यंत आणि तिथून कळमना पोलीस स्टेशनपर्यंत स्वतः एकटीच गेली आहे, हे सीसीटीव्ही फुटेजच्यामाध्यामातून पोलिसांच्या लक्षात आले.

सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या तपशीलाप्रमाणे तक्रार करणारी तरुणी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास बसने सिताबर्डी परिसरात दाखल झाली होती.  सुमारे एक तास ती सीताबर्डी परिसरात विविध ठिकाणी फिरत राहिली.  त्यानंतर ती एका शेअरिंग ऑटोने मेयो रुग्णालयापर्यंत पोहोचली. तिथून एका दुसऱ्या ऑटो ने कळमना परिसरात चिखली मैदान वर ( कथित घटनास्थळा पर्यंत ) पोहोचली. 

या संपूर्ण प्रवासात तिच्या सोबत कोणीही नव्हतं. कोणीही तिचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला नाही.  हे सीसीटीव्ही मधून लक्षात आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिची कसून चौकशी केल्यावर  तरुणीने खोटी तक्रार दिल्याची कबुली दिली.

कुटुंबात सुरू असलेल्या वादातून तिने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे. दरम्यान पोलिसांनी सकाळी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा कळमना पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला होता. 

आता कायदेशीर प्रक्रियेनुसार तो गुन्हा रद्द केला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.