'....अपमान किती सहन करायचा', 'मनसे'चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया

MNS Vasant More Resignation: मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली. दरम्यान हा निर्णय का घेतला याचा उलगडा त्यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 12, 2024, 02:44 PM IST
'....अपमान किती सहन करायचा', 'मनसे'चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया title=

MNS Vasant More Resignation: मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत असल्याचं जाहीर केलं आहे. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचं एक मोठं नाव असून, त्यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का आहे. दरम्यान आज आपला कडेलोट झाला असून, आपणच यासाठी कारणीभूत असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत. लोकांना आता मी नाटक करतोय का अशी शंका येऊ लागली आहे आणि यासाठी पुणे शहरातील कोअर कमिटी जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. 

"वारंवार एकनिष्ठतेवर संशय घेतला जात असेल, सांगूनही माझ्यावरच कारवाया होत असतील तर मी हतबल आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललो होतो. पण पुण्यात लोकसभा लढण्यासाठी नकारात्मक वातावरण असून आपण लढू शकत नाही असे रिपोर्ट पाठवले जात आहेत. संघटनेला पूरक वातावरण असतानाही डावललं जात असेल आणि जर राज ठाकरेंपर्यंत चुकीचे संदेश जात असतील तर येथे थांबण्यात काही अर्थ नाही. अखेर अपमान किती सहन करायचा. म्हणून आज एकनिष्ठतेचा कडेलोट केला," असा खुलासा वसंत मोरेंनी केला आहे. 

"ज्या शहरात मनसे दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होता, ज्या शहराचा विरोधी पक्षनेता मनसेचा होता तिथे पक्षाची ताकद आहेच. पण आता ताकद नाही असं दाखण्याचं काय कारण आहे? मला माझ्याच पक्षातून वारंवार विरोध होत आहे. सतत माझ्या एकनिष्ठतेवर प्रश्चचिन्ह का उपस्थित केलं जात आहे? लोकांना आता मी नाटक करतोय का अशी शंका येऊ लागली आहे आणि यासाठी पुणे शहरातील कोअर कमिटी जबाबदार आहे. नकारात्मक संदेश दिले जात असून, हे चुकीचं आहे," असा गंभीर आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी कोणाचीही नावं घेणं टाळलं. 

"मी अनेकदा राज ठाकरेंपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या आहेत. पण आज माझा कडेलोट झाला आहे. यासाठी मीच कारणीभूत आहे. पुणेकर माझी पुढील दिशा ठरवतील. माझ्या वयाची 25 वर्षं ज्या पक्षात घालवली तो सोडल्यानंतर पुणेकर पुढील वाटचाल ठरवतील," असंही वसंत मोरे म्हणाले आहेत.

पुणे शहरात पक्षाला संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे असाही आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. तसंच आपण परतीचे दोर कापले असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपण मनसेला सोडचिठ्ठी देल्यानंतर अनेक पक्षाचे फोन येत आहेत. पण त्यांनी याआधी संपर्क का केला नाही? अशा विचारणाही त्यांनी केली.