नागपुरात पाणी संकट, मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा

नागपूर शहरात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. मृतसाठा वापरण्याची वेळ  महापालिकेवर आली आहे.

Updated: May 22, 2019, 04:21 PM IST
नागपुरात पाणी संकट, मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा  title=
संग्रहित छाया

जितेंद्र शिंगाडे, नागपूर : शहरात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. अशा परिस्थितीत तोतलाडोह प्रकल्पातील मृत साठ्याच्या (Dead Stock) पाण्याची उचल करण्यास नागपूर महापालिकेने सुरुवात केली आहे. नागपूर शहराला पेंच प्रकल्प आणि कन्हान नदीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु या ठिकाणी देखील पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाण्याचा मृतसाठा वापरण्याची वेळ नागपूर महापालिकेवर आली आहे.

आरक्षित पाण्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक असते. यासाठी मृत जलसाठ्यातील एका सिमेनंतरच्या पाण्याचा वापर पाणीपुरवठ्यासाठी देता येत नाही. मात्र यंदा हा मृत जलसाठा देखील वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. या संदर्भात गेल्याच आठवड्यात नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मृत जलसाठा वापरण्याची परवानगी मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी हा मृत जलसाठा वापरण्याची परवानगी दिल्यावर आता या मृत जलसाठ्यातून नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे.

या मृत जलसाठ्यातून दररोज १ दशलक्ष घनमीटर याप्रमाणे पाण्याची उचल करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागच्या सभापतींनी दिली. हा जलसाठा पुढील एक महिना नागपूरकरांची तहान भागवण्यासाठी पुरेसा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र पाउस लवकर आल्यास हा मृत जलसाठा पूर्ण वापरण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच शहरात पिण्याचा वापर बांधकामासाठी करणाऱ्या ७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.