'योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ', खडसेंचा भाजपला सोडचिठ्ठी द्यायचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे.

Updated: May 10, 2020, 11:29 PM IST
'योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ', खडसेंचा भाजपला सोडचिठ्ठी द्यायचा इशारा title=

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. भाजपमध्ये सातत्याने डावललं जात असल्याचंही खडसे म्हणाले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही, पण कोरोनाच्या संकटानंतर आपण राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेत खडसेंनी दिले आहेत.

'भाजपच्या असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांचे मला फोन येत आहेत. भाजपमध्ये राहण्याबाबत काहीतरी निर्णय घ्या, असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. वारंवार अन्याय होत आहे, वारंवार तुम्हाला बाजूला सारलं जातंय. त्यामुळे याचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असा अनेक कार्यकर्त्यांचा दबाव आहे. बाकीचे पक्षही मला विचारणा करत आहेत,' असं खडसे म्हणाले.

'पक्षामध्ये अनेक निष्ठावान लोक विधानपरिषदेचं तिकीट मिळेल, म्हणून काम करत आहेत. माधव भांडारी, केशव उपाध्ये, अवधूत वाघ यांच्यासारखे बरेच कार्यकर्ते अनेक वर्ष पक्षाचं एकनिष्ठ काम करत आहेत. या कार्यकर्त्यांना विधानपरिषदेत स्थान मिळावं अशी अपेक्षा आहे,' अशी प्रतिक्रियाही खडसेंनी दिली. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंनी भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती, पण पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही. भाजपने तिकीट नाकारल्यामुळे खडसेंनी भाजपवर याआधीही टीका केली होती. 

विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने खडसे भडकले