विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने खडसे भडकले

भाजप कुठल्या दिशेने चाललाय, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला

Updated: May 8, 2020, 03:13 PM IST
विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने खडसे भडकले title=

मुंबई: भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारीही नाकारण्यात आल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे चांगलेच भडकले आहेत. भाजपने शुक्रवारी विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर त्यांनी 'झी २४ तास'शी बोलताना आपल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली. यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटले की, मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचे काम करणाऱ्यांना संधी द्यायला हवी होती. तसे झाले असते तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या देणाऱ्यांना इथं संधी दिली गेली आहे. भाजप कुठल्या दिशेने चाललाय, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. 

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना बेंचवरच बसावे लागले आहे. शेवटच्या क्षणी चौघांचाही पत्ता कापून पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली. (कोण आहेत भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार?) 

त्यामुळे खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिषदेच्या उमेदवारीसाठी माझ्यासह पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांचे नाव दिल्लीला पाठवण्यात आल्याचे मला सांगण्यात आले होते. पण आता वेगळीच नावे समोर आली आहेत.
यामध्ये धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आहेत. याच पडळकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. जवळपास पक्षाला शिव्याच घातल्या होत्या.

'मोदी गो बॅक' अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीत अनेक वर्षे असलेल्या मोहिते-पाटलांना संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजप कोणत्या दिशेने चाललाय, यावर आता चिंतन करण्याची गरज आहे, असे खडसे यांनी म्हटले.