महाराष्ट्रात एअरटेलची गुजराती जाहीरात, मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक

एअरटेलच्या गुजराती जाहिरातीवर मनसेने आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या मुलुंड इथं मराठी महिलेला गुजराती रहिवासी इमारतीत ऑफिस नाकारल्याची घटना घडली होती. मनसेने दणका दिल्यानंतर इमारतीच्या सेक्रेटरीने माफी मागितली होती. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Oct 3, 2023, 07:51 PM IST
महाराष्ट्रात एअरटेलची गुजराती जाहीरात, मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुन्हा आक्रमक झाली आहे. मुंबईतल्या मुलुंडमध्ये मराठी महिलेला गुजराती रहिवासी इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणात मनसेने दणका दिल्यानंतर इमारतीच्या सेक्रेटरीला माफी मागावी लागली होती. हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. एअरटेल कंपनीच्या (AirTel) गुजराती जाहीरातीवर (Advertisment) मनसेने आक्षेप घेतला आहे. 

एअरटेल कंपनीविरोधात आक्रमक
एअरटेलच्या गुजराती जाहिरातीवर मनसेने आक्षेप घेतला आहे. एअरटेलने एक जाहीरात प्रसिद्ध केली असून यात मुंबईकरांसाठी गुजराती भाषेत आवाहन करण्यात आलं आहे. याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात जर #Airtel मराठी भाषेला स्थान देणार नसेल, आमच्यावर गुजराती भाषा लादणार असेल तर आम्ही महाराष्ट्रात ऐरटेलला स्थान देणार नाही. airtelindia ने त्वरित चुक सुधारून माफी मागा आणि गुजराती जाहिरात महाराष्ट्रात बंद करा. अन्यथ...टेल खेचू असा इशारा मनसे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी दिला आहे

मराठीच्या मुद्द्यावर मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सवालही उपस्थित केला आहे. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत' म्हणायचं आणि स्वतःच्या समाजाच्या वेगळ्या सोसायट्या करून राहायचं, महाराष्ट्राच्या शहरांतून स्थानिक मराठी माणसालाच हाकलायचं... 'एक भारत, श्रेष्ठ भारत' म्हणणारे आता का मूग गिळून गप्प आहेत?

मराठीच्या मुद्दयावर मनसे आक्रमक
मराठीच्या मुद्द्यावर मनसेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.मुलुंड मध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारली आणि हा ही मुद्दा मनसेने उचलून धरत मुलुंड मधील शिव सदन रहिवासी सोसायटीमधील रहिवाशांना मनसे स्टाईल जाब विचारला आणि माफी मागण्यास भाग पाडले. 

तर कल्याण मध्ये परप्रांतीय फेरीवाल्याच्या मुद्द्यावरती मनसेने आक्रमक भूमिका घेत या परप्रांतीय फेरीवाल्याला चोप दिला होता. समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर काम करणाऱ्या मराठी कर्मचारी तरुणांना परप्रांतीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करीत मनसे महिला आघाडीच्या महिलांनी टोल नाक्यावरील परप्रांतीय अधिकाऱ्याला दणका दिला होता.