बेस्ट कामगारांचा संप लांबणीवर, उपोषणाने आंदोलनाला सुरुवात

पगाराच्या मुद्द्यावर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संपाचा निर्णय घेतला. मात्र, हा संपाचा निर्णय तूर्त तरी लांबणीवर टाकण्यात आला आहे. संपाऐवजी येत्या १ ऑगस्टपासून कामगार कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी बेमुदत उपोषण करणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 21, 2017, 07:08 PM IST
बेस्ट कामगारांचा संप लांबणीवर, उपोषणाने आंदोलनाला सुरुवात title=

मुंबई : पगाराच्या मुद्द्यावर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संपाचा निर्णय घेतला. मात्र, हा संपाचा निर्णय तूर्त तरी लांबणीवर टाकण्यात आला आहे. संपाऐवजी येत्या १ ऑगस्टपासून कामगार कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी बेमुदत उपोषण करणार आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला. परंतु संपाऐवजी सर्व कामगार साखळी उपोषण करणार असल्याचे समितीच्यावतीने शशांक राव यांनी स्पष्ट केलेय. संप करावा की करू नये, याबाबत कृती समितीने मतदान घेतले होते. त्यात ९७ टक्के कामगारांनी संप करावा, असा कौल दिला होता. 

या कौलानंतर आज कृती समितीची बैठक झाली व या बैठकीत आधी उपोषण करायचे आणि त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाही तर संपाचे अंतिम हत्यार उपसायचे असा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. त्यामुळे १ ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात होणार आहे.

या उपोषणात बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, समर्थ बेस्ट कामगार संघटना, भाजपा बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट कामगार संघटना, बेस्ट एम्प्लॉइज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, बेस्ट जागृत कामगार संघटना या संघटना सहभागी होणार आहेत.