दिवाळीनंतरच मंत्रीमंडळ फेरबदल, राणेंची वर्णी लागणार

राज्यात अनेक दिवस रखडलेला मंत्रीमंडळ फेरबदल दिवाळीनंतरच होण्याची चिन्हं आहेत.

Updated: Oct 4, 2017, 05:51 PM IST
दिवाळीनंतरच मंत्रीमंडळ फेरबदल, राणेंची वर्णी लागणार title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : राज्यात अनेक दिवस रखडलेला मंत्रीमंडळ फेरबदल दिवाळीनंतरच होण्याची चिन्हं आहेत. भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे फेरबदल करताना नारायण राणेंना मंत्रीमंडळात स्थान दिले जाणार आहे.

काल राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राणेंना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. मात्र भाजपातील सूत्रांच्या माहितीनुसार राणेंना कोणतं खातं द्यायचं हे अद्याप निश्चित झालेलं नाही. राणेंनी भाजपाकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण यापैकी एक खातं मागितलं आहे. मात्र भाजपाने अद्याप कोणतं खातं द्यायचा याचा निर्णय घेतलेला नाही.

दुसरीकडे राज्यमंत्रीमंडळात मोठे फेरबदल होणार असून आतापर्यंत ज्या आमदारांना संधी मिळाली नाही, त्यांना या फेरबदलात संधी मिळेल असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मंत्रीमंडळ फेरबदल करताना अनेक विद्यमान मंत्र्यांना वगळलं जाणार आहे. वादग्रस्त ठरलेले आणि परफॉर्मन्स दाखवू न शकलेल्या मंत्र्यांना या फेरबदलातून वगळलं जाणार असल्याची चर्चा आहे.