बेस्ट कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार बोनस जाहीर

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्यामुळे संपूर्ण वाहतूक यंत्रणाच कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबईतील बेस्ट कर्मचारीही संपावर जाण्याच्या विचारात होते. मात्र, महापालिकेने या कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार बोनस देण्याचा निर्णय घेतला आणि संभाव्य संप टळला.

Updated: Oct 18, 2017, 08:06 PM IST
बेस्ट कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार बोनस जाहीर title=

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्यामुळे संपूर्ण वाहतूक यंत्रणाच कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबईतील बेस्ट कर्मचारीही संपावर जाण्याच्या विचारात होते. मात्र, महापालिकेने या कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार बोनस देण्याचा निर्णय घेतला आणि संभाव्य संप टळला.

मुंबई महापालिका बेस्टला बोनससाठी २५ कोटी रूपये अँडव्हान्सपोटी देणार आहे. बेस्टच्या ४१ हजार कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे. यामुळे वडाळ्यामध्ये सुरू असलेलं युनियनच्या नेत्यांचं उपोषण आंदोलन आणि शनिवारी होणारा बेस्टचा एकदिवसीय संपही मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षीही साडेपाच हजार रूपये बोनस दिला गेला होता. मात्र, यंदा आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळं बोनसचा प्रश्न रेंगाळला होता.

दरम्यान, कर्मचारी आंदोलन आणि संपावर ठाम राहिल्याने अखेर बोनसचा प्रश्न निकालात काढण्यात आला. कायदेशीर अडचणींमुळे महापालिकेला बेस्टला थेट मदत करण्यात अडचणी आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका बोनस ऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरुपात कर्ज म्हणून आणि  सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देण्यास तयार झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होणार असली तरी, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मात्र अंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे. एसटी कर्मचारी संपाचा आज (बुधवार, १८ ऑक्टोबर) दुसरा दिवस असून, ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पगारवाढीसाठी सरकार तयार आहे. हट्ट सोडा. तुम्ही लढा द्या मात्र, ऐन दिवाळीत अन्नदात्याचे हाल करू नका. कामावर परत या, असे अवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.