गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करा, इकबाल सिंह चहल यांचे निर्देश

गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्गांचा आढावा घेऊन खड्डे आढळल्यास रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करावे असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसंच धोकादायक रेल्वे पूलांवरून प्रवास करताना काळजी घेण्याचे तसंच देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Aug 29, 2023, 07:00 PM IST
 गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करा, इकबाल सिंह चहल यांचे निर्देश title=

देवंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तीचं आगमन आणि विसर्जन (Ganesh idol arrival-immersion) सुरळीत पद्धतीने व्हावं, यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गांचा आढावा घ्यावा. त्या मार्गावर खड्डे (Potholes) आढळून आल्यास एका आठवड्याच्या आत खड्डे बुजवावेत असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तसंच प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिले आहेत. याशिवाय श्रीगणेश विसर्जनासाठी धोकादायक रेल्वे पुलांवरून मिरवणूक नेताना गणेशभक्तांनी काळजी घ्यावी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तसंच मुंबई पोलीस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहनही महानगरपालिका आयुक्तांनी केलं आहे.

19 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीदरम्यान श्री गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सव आनंदात आणि सुरळीतपणे पार पडावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये श्री गणेशमूर्तींचे आगमन तसंच विसर्जन मार्गाची पाहणी करून आवश्यक असेल तिथे डागडुजी करणं, गणेशोत्सवादरम्यान विविध गणेश मंडळांच्या परिसरात अधिकाधिक स्वच्छता राखणे, विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था राखणं, गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या देणं तसंच अन्य सोयीसुविधांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मध्यवर्ती यंत्रणांसह परिमंडळीय सहआयुक्त, उप आयुक्त, 24 विभागांचे सहायक आयुक्त तसंच संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. त्यात गणेशोत्सवाशी निगडित सर्व कामे योग्यरित्या आणि वेळेवर पूर्ण करण्याच्या, तसंच रस्त्यांची नियमितपणे पाहणी करून खड्डे आढळून आल्यास ते त्वरित भरण्याच्या निर्देशांचा समावेश आहे. 

पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर काही ठिकाणी खड्डे झाले असून ते बुजवण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. असं असलं तरी, गणेशोत्सवाच्या कालावधीत श्रीगणेशाचं आगमन, तसंच विसर्जनादरम्यान कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. असे निर्देश इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. 

जुन्या व धोकादायक पुलांवरुन मिरवणूक नेताना काळजी घेण्याचं आवाहन
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रेल्वे मार्गावरील काही पूल धोकादायक स्वरुपाचे असून काही पुलांच्या दुरुस्तीची कामं सुरु आहेत. शिवाय, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येत असल्यामुळे गणेशभक्तांनी श्रीगणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका तसंच मुंबई पोलीस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

करी रोड स्थानकावरील पूल, साने गुरुजी मार्गावर (आर्थर रोड) असणारा चिंचपोकळी रेल्वेस्थानकावरील पूल आणि भायखळा परिसरातील रेल्वे मार्गावरील ‘मंडलिक पूल’ या पुलांवर एकावेळेस 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही (भाविकांचे व वाहनांचे मिळून एकंदर वजन); याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली आल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांची जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे, पोलीस व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे. 

या सर्व सुचनांचे काळजीपूर्वक पालन करावे व गणेशोत्सवातील विसर्जनाचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडण्यास बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिस यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महागरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

धोकादायक पुलांची यादी
मध्य रेल्वे – 
१) घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज
२) करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज
३) आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज
४) भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज

पश्चिम रेल्वे
१) मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज
२) सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
३) फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
४) केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
५) फॉकलन्ड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
६) बेलासिस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ 
७) महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रिज
८) प्रभादेवी–कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज
९) दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज.