काळाचौकीतील त्या महिलेच्या मुलीचं अपहरण नाही तर 'हे' धक्कादायक कारण आलं समोर

आईला गुंगीचे औषध देऊन बाळ पळवल्याची घटना काल मुंबईत समोर आली होती

Updated: Dec 2, 2021, 05:36 PM IST
काळाचौकीतील त्या महिलेच्या मुलीचं अपहरण नाही तर 'हे' धक्कादायक कारण आलं समोर title=

मुंबई : जुन्या मोबाइलच्या बदल्यात वस्तू देण्याच्या नावाखाली, आईला गुंगीचे औषध देऊन बाळ पळवल्याची घटना काल मुंबईत समोर आली होती. या बातमीने मुंबईत एकच खळबळ उडाली होती. लहान मुलं पळवणारी टोळी मुंबईत कार्यरत असल्याचंही बोललं जात होतं.

पण आता या घटनेला धक्कादायक वळण मिळालं आहे. काळाचौकी परिसरातून तीन महिन्याच्या गायब झालेल्या मुलीची आईनेच हत्या केल्याचं उघड झालं आहे. 

म्हणून मुलीची हत्या
या मुलीचं अपहरण झालं नव्हतं तर दुसरीही मुलगीच झाल्याने आईनेच पाण्याच्या टाकीत मुलीला टाकून तिची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आईने भांडी विक्रेत्या महिलेनं गुंगीचं औषध देऊन आपल्या 3 महिन्याच्या मुलीचं अपहरण केल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.

महिलेने रचला असा बनाव
या महिलेचं नाव सपना मगदूम असून तीने मुलीचं अपहरण केल्याचा बनाव रचला. आपण घरी एकटीच असताना एक अज्ञात महिला जुन्या मोबाइलच्या बदल्यांत कपडे ठेवण्याचे बास्केट विकण्यासाठी आली. बास्केट घेण्यासाठी घरातील जुने मोबाईल देण्याच्या हेतून आतल्या खोलीत गेली.

त्यावेळी सपना मगदूम यांची 3 महिने 15 दिवसांची मुलगी वेदा ही कॉटवर झोपली होती. जुने मोबाईल आणण्यासाठी मी आतमध्ये गेले, तेवढ्यात पाठीमागून आलेल्या महिलेने आपल्या बेशुद्ध कण्याचं औषध नाकाला लावून बेशुद्ध केलं. आणि पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या मुलीला उचलून पोबारा केला, असा दावा सपना मगदूमने केला होता.

पोलीस तपासात उलगडा
या महिलेने दिलेल्या माहितीत पोलिसांना तफावत आढळली. पोलिसांना या महिलेवरच संशय आला आणि पोलीसी खाक्या दाखवताच आपणच मुलीची हत्या केल्याचं या महिलेने कबुल केलं.