भाजपच्या दोन नगरसेविकांकडून चुकून शिवसेना उमेदवाराला मतदान

 ९ पैकी ७ मतेच सुरेखा पाटील यांना पडली तर २ मते वाया गेली.

Updated: Oct 5, 2020, 03:31 PM IST
भाजपच्या दोन नगरसेविकांकडून चुकून शिवसेना उमेदवाराला मतदान title=

मुंबई :  मुंबई महापालिकेत नुकत्याच झालेल्या शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपच्या दोन नगरसेविकांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केल्यानं ते मतदान अवैध ठरले. ही चूक लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. सुरुवातीला भाजप उमेदवाराच्या समर्थनात या दोन्ही नगरसेविकांनी हात वर करुन आवाजी मतदान केले. मात्र, मतदान पत्रिकेवर सही करताना शिवसेना उमेदवार संध्या दोषी यांच्या नावासमोर सही केली. त्यामुळे भाजपची दोन मते वाया गेली. ९ पैकी ७ मतेच सुरेखा पाटील यांना पडली तर २ मते वाया गेली.

अवैध मतदान केलेल्या भाजपच्या बिंदू त्रिवेदी आणि योगिता कोळी यांना भाजप कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिका स्थायी समिती निवडणूकीतून काँग्रेसचे उमेदवार असिफ झकेरिया यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचे यशवंत जाधव आणि भाजपचे मकरंद नार्वेकर यांच्यात लढत होतेय.

स्थायी समितीतील शिवसेनेचे संख्याबळ १२ इतकं आहे. भाजपच संख्याबळ १० आहे पण मतदानाचा अधिकार ९ जणांना असेल. भालचंद्र शिरसाट स्विकृत नगरसेवक असल्यानं त्यांना मतदानाचा अधिकार नाही. काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि सपा १ असं संख्याबळ आहे. 

मुंबई महापालिकेत शिक्षण समिती निवडणूकीत कॉंग्रेसने  महाविकास आघाडी धर्म पाळल्याचे दिसून आले. मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आला. आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला. यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी असल्याचे दिसून आले. यामुळे शिवसेनेच्या संध्या दोशी यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सर्व प्रकारामुळे महापालिकेतील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे मनसूबे फोल ठरले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट नको म्हणून कॉंग्रेसनं आज महापालिकेतील समित्यांच्या पहिल्या समितीच्या- शिक्षण समितीच्या निवडणूकीत अध्यक्षपदाचा उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. 

कॉंग्रेसने अर्ज मागे घेतला नसता तर भाजपनं कॉंग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान उभे केले असते.