मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या हल्लाबोल मोर्चात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारांवर जोरदार टीका केली.
महागाई, बेरोजगारी, बंद पडत असलेले कारखाने यावरून पवारांनी हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची घोषणा झाली. लोकांच्या भावनेला हात घातला जातोय, मात्र प्रत्यक्षात या स्मारकांची कामं सुरू नसल्याचं पवारांनी अधोरेखित केलं. मोदींनी अच्छे दिनची घोषणा केली होती, मात्र आता आमचे जुने दिवस द्या अशी मागणी लोक करत असल्याचं पवार म्हणाले.
रेशनवर गहु, तांदुळ देण्याऐवजी मका दिला जातोय. सरकार सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची टीका त्यांनी केली. नीरव मोदीच्या भ्रष्टाचारावरूनही पवारांनी पंतप्रधानांना टोला लगावला. भाजपाला सत्तेतून काढल्यावरच हल्लाबोल थांबेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.