'नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी'

राणे मुख्यमंत्री असताना कोकणासाठी एकही प्रकल्प आणू शकले नाहीत. 

Updated: Aug 9, 2020, 05:28 PM IST
'नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी' title=

मुंबई: नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही कामधंदा उरलेला नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. नाणार प्रकल्पाला ८० टक्के स्थानिकांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केला जातो. मात्र, यामागे शिवसेनेचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू आहे, असे राणे यांनी म्हटले होते.

उद्धव ठाकरे आठ बाय आठच्या खोलीत बसून महाराष्ट्राचा कारभार चालवतायत- राणे

गुलाबराव पाटील यांनी राणेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले की, नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. ते घडीत काही बोलतात, नंतर काहीतरी बोलतात. बोललल्याशिवाय त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही म्हणून ते तोच प्रयत्न करतात. ते मुख्यमंत्री असताना कोकणासाठी एकही प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे आता राणेंनी बाकीच्या गोष्टी बोलू नयेत. परंतु, बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्ये करत असतात, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

सरकारमध्ये तीन-चार मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद- राणे

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी नाणार प्रकल्पाला लोकांचा पाठिेंबा असल्याचा दावा केला होता. शिवसेनेने पूर्वी या प्रकल्पाला विरोध केला आणि आता या प्रकल्पाचे समर्थन केले जात आहे. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे. यामागे पैसा कमावणे हाच शिवसेनेचा उद्देश असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. मात्र, शिवसेना नेते उदय सामंत यांनी नाणारचा विषय शिवसेनेसाठी कायमचा संपल्याचे स्पष्ट केले होते.